मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल
By बापू सोळुंके | Published: February 26, 2024 08:43 PM2024-02-26T20:43:39+5:302024-02-26T20:44:54+5:30
मनोज जरांगे यांना सोमवारी सायंकाळी सात वाजता रूग्णालयात करण्यात आले दाखल
बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने सोमवारी सायंकाळी त्त्यांना पोलीस बंदोबस्तात अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटी(जि. जालना) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध आरोप केले. या आरोपानंतर ते उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोखल्यानंतर भांबेरी येथे मुक्काम करून आज सकाळी अंतरवाली सराटीला परतले होते. त्यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. यामुळे आज सोमवारी सायंकाळी साडेसहा-सातच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात त्यांना शहरातील उल्कानगरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. हा अहवाल आल्यानंतर उपचाराची दिशा ठरणार आहे. त्यांना अशक्तपणा आणि अतिसार आणि अन्य त्रास होत असल्याने चार ते पाच दिवस त्यांना रुग्णालयात ॲडमिट राहून उपचार घ्यावे लागण्याची शक्यता असल्याचे डॉ. विनोद चावरे यांनी सांगितले.