मराठा आरक्षण आंदोलन: छत्रपती संभाजीनगरहून बीड, सोलापूर, तूळजापूर बससेवा ठप्प
By संतोष हिरेमठ | Published: October 29, 2023 03:04 PM2023-10-29T15:04:42+5:302023-10-29T15:06:40+5:30
पैठण फाटा ते अंतरवाली सराटी या मार्गावरील ‘कँडल मार्च’मुळे शनिवारी सायंकाळी सिडको बसस्थानकाची बीड मार्गावरील बससेवा सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाने सिडको बसस्थानकातून धावणाऱ्या बीड, सोलापूर, तूळजापूर, लातूरची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
पैठण फाटा ते अंतरवाली सराटी या मार्गावरील ‘कँडल मार्च’मुळे शनिवारी सायंकाळी सिडको बसस्थानकाची बीड मार्गावरील बससेवा सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात आली होती. यामुळे बीड जाणाऱ्या प्रवाशांची सिडको बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती. बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना ताटकळावे लागले. बस येत नसल्याचे पाहून अनेकांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास केला. सलग दुसऱ्या दिवशी, रविवारीही सिडको बसस्थानकातून सुटणाऱ्या बीड, सोलापूर, तूळजापूर, लातूरच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या.
मराठा आरक्षण मागणीसाठी व मनोज जरांगे - पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठींबा म्हणून गेल्या ४ दिवसांपासून मराठा समाज बांधव धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले आहेत. राज्य सरकारने समाजाची फसवणुक करत हे शासन जरांगे - पाटील यांच्या जिवावर उटले आहे असे म्हणत याचा निषेध करत एस टी बस वरील शासकिय जाहिरातीवर असलेल्या पंतप्रधान , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले .आरक्षण न दिल्यास जरांगे- पाटील यांच्या सल्ल्याने आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
बीडमध्येही बस सेवा बंद
बीड जिल्ह्यामध्ये रात्री बसेस पेटवून दिल्याच्या घटना घडल्याने खबरदारी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व एसटी मंडळाच्या वित्तीय नुकसानीमुळे जिल्ह्यातील बस सेवा आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. बस सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसेस आगारामध्ये उभ्या करण्यात आल्या असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलना दरम्यान बस वर दगडफेक होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बससेवा बंद असल्याने प्रवासी खाजगी वाहनांचा आधार घेताना दिसत आहेत.