मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरूच; मराठवाड्यात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:41 AM2018-07-22T02:41:58+5:302018-07-22T02:42:24+5:30
परळीतील ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच, हिंगोलीत एसटी बस लक्ष्य
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरूच आहे. हिंगोलीत आंदोलकांनी आक्रमक होत बसगाड्यांना लक्ष्य केले. बीड जिल्ह्यात परळीत बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आंदोलकांनी दुपारपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच होते.
हिंगोली येथे सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्ह्यात चार बस फोडल्या. दोन ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करून प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बीड जिल्ह्यात परळीतील आंदोलनाला पाठिंबा देत विविध पक्ष व संघटनांचे नेते, पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. शनिवारी शिवसंग्रामचे
आ. विनायक मेटे व इतर पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. शनिवारी औरंगाबादला क्रांती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.
लातूर, परभणी, नांदेडमध्ये आंदोलन
लातूर जिल्ह्यात रेणापूर बंदची हाक देण्यात आली होती़ त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. औसा येथे रास्ता रोको झाला. परभणीत पाथरी व सेलू येथे शनिवारी आंदोलन झाले. पाथरी येथील चक्काजाम आंदोलन झाले.
नांदेड येथे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील स्वत: आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.