Maratha Reservation : माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दिलासादायक पाऊले उचलावी : संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 12:37 PM2021-05-26T12:37:12+5:302021-05-26T12:41:19+5:30
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे भेटणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार.
औरंगाबाद : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने समाजासाठी काय करता येईल यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. याकरिता दोन दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल नांदेड आणि जालना जिल्ह्याचा दौरा करुन ते रात्री औरंगाबाद शहरात मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि मराठा क्रांती मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याशी चर्चा केली. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्न शासनदरबारी पोहचवण्यासाठी ५८ मोर्चे काढून झाले. आता रस्त्यावर आंदोलनाची गरज नाही. कोविडच्या कालावधीत आंदोलन करून जनतेचा जीव धोक्यात कशासाठी घालायचा असा सवाल त्यांनी उपस्थित करुन आमदार विनायक मेटे यांनी ५ जून रोजी आयोजित केलेल्या मोर्चा चुकीचा असल्याचे एकप्रकारे संकेत दिले.
तसेच मराठा आरक्षणापेक्षाही सारथी संस्था महत्वाची आहे. मात्र, ज्या व्यक्तीना मराठा समाजाबद्दल आस्था नाही अशा लोकांच्या हातात सारथीचे सुत्र आहेत. सारथीमध्ये मराठा समाजाचा व्यक्ती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पावले उचलावीत .यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आपसांततील हेवेदावे बाजूला ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. याकरिता दोन दिवसात शरद पवार , देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर २८ मे रोजी त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले