Maratha Reservation : 'मराठा क्रांती मोर्चा नावाने राजकीय पक्ष नको, अन्यथा रोखठोक उत्तर'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 09:58 PM2018-09-16T21:58:28+5:302018-09-16T21:59:57+5:30
Maratha Reservation : कोपर्डीतील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पीडितेला न्याय मिळाला आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मुख्य मागणीसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे,
औरंगाबाद : कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्यारुपाने मराठा समाजाचे देशातील पहिले सामाजिक आंदोलन सुरू झाले. केवळ मराठा समाजाच्या आस्था क्रांती मोर्चाशी जुळलेल्या आहेत, असे असताना कुणी वैयक्तिक फायद्यासाठी राजकीय पक्ष काढत असेल तर त्याला मराठा क्रांती मोर्चा विरोध करेल, असा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. तसेच तसा प्रयत्न झाल्यास रोखठोक उत्तर मिळेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
कोपर्डीतील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पीडितेला न्याय मिळाला आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मुख्य मागणीसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतीमालाला भाव मिळावा, आदी मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा पहिला मूकमोर्चा औरंगाबादेत झाला. त्यानंतर राज्यात आणि संपूर्ण देशात 58 मूकमोर्च निघाले. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जलदगती न्यायालयात कोपर्डीचा खटला चालविण्यात आला. न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. मात्र, अद्यापही आरोपींना शिक्षा झालेली नाही. अन्यायाविरोधात लढा देणारी ही एक सामाजिक चळवळ निर्माण झालेली आहे. मराठा क्रांती मोर्चाशी संपूर्ण मराठा समाजाच्या आस्था जुळलेल्या आहेत, असे असताना काही जण राजकीय स्वार्थासाठी मराठा क्रांती मोर्चा अथवा सकल मराठा या नावाने राजकीय पक्ष काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे क्रांती मोर्चा अथवा सकल मराठा नावाने कुणीही संघटना बांधणी करू शकत नाही. कोणी जर तसा प्रयत्न केल्यास क्रांती मोर्चा संबंधितांना रोखठोक उत्तर देतील, असा ठराव एकमताने या बैठकीत घेण्यात आला. यावेळी विजय काकडे, रमेश गायकवाड, प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, अंकत चव्हाण, सुनी कोटकर, शिवाजी जगताप, रामेश्वर राजगुरे, सुवर्णा मोहिते पाटील, प्रदीप हारदे, प्रशांत शेळके, बाळासाहेब औताडे, संदीप सपकाळ, योगेश औताडे, विलास औताडे, रेखा वाहटुळे,सतीश वेताळ, अमोल साळुंके, सुकन्या भोसले, नितीन कदम, गणेश जाधव, दादासाहेब बोरसे आणि सचिन मिसाळ आदींची उपस्थिती होती.