Maratha Reservation : मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा; संभाजी ब्रिगेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 07:38 PM2021-05-13T19:38:22+5:302021-05-13T19:39:33+5:30
Maratha Reservation : आताचे सरकार आणि विरोधी पक्षांच्या चुकीच्या धोरणामुळे संभाजी ब्रिगेडला असा निकाल अभिप्रेत होता.
औरंगाबाद: मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केली. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही हे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १४ मे रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एसईबीसी वर्गातील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. हा निकाल दुर्दैवी व मराठा समाजावर अन्याय करणारा आहे. आताचे सरकार आणि विरोधी पक्षांच्या चुकीच्या धोरणामुळे संभाजी ब्रिगेडला असा निकाल अभिप्रेत होता. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू न करता वेळोवेळी सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारांनी मराठा समाजाला असंविधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. मराठा समाज व मराठा संघटनांना झुलवत ठेवले आणि मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली. केंद्र सरकारने विशेष घटना दुरुस्तीच्या माध्यमातून राज्यघटनेत नवे ३४२ अ कलम आणले आणि एसईबीसी हा नवीन प्रवर्ग निर्माण केला आहे.
तांत्रिक व कायदेशीर अंगाने विचार केला तर कलम ३४० अंतर्गत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग याचा व कलम ३४२ अ यामध्ये फरक दिसून येत नाही परंतु संभ्रम निर्माण झाला. याच कारणामुळे संभाजी ब्रिगेडने सुरुवातीपासूनच मराठा समाजाला संविधानिक व सगळीकडे टिकणारे कायदेशीर आरक्षण लागू करावे ही मागणी केलेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोरोनाचे कडक निर्बंध संपल्यानंतर राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये आमची ही मागणी मान्य करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा भानुसे यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, जिल्हा संघटक जगन्नाथ आदटराव, वैभव बोडके व स्वप्नील घुमरे आदींची उपस्थिती होती.