मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना मदतीच्या निर्णयाचा युतीला पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:50 PM2018-11-28T18:50:58+5:302018-11-28T18:51:28+5:30
मदतीचे महापौरांसह महापालिका प्रशासनाला आता याचा विसर पडला.
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून चार जणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेतला होता. मात्र, महापौरांसह महापालिका प्रशासनाला आता याचा विसर पडला.
सोमवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन सभेतील निर्णयाची आठवण करून दिली. तीन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथील जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने पाण्यात उडी घेतली. या घटनेत शिंदे याचा मृत्यू झाला. शहरातही प्रमोद हारे, उमेश शेळके, कारभारी शेळके यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. मनपा सत्ताधाऱ्यांनीही आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
महापौर नंदकुमार घोडेले यांनी चार दिवसांतच मदत घरपोच देणार असल्याचे जाहीर केले होते. आजपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सोमवारी काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेविका वैशाली साळवे, अनिता साळवे यांनी त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली