मराठा आरक्षणास सरकार अनुकूल

By Admin | Published: March 20, 2016 11:55 PM2016-03-20T23:55:23+5:302016-03-21T00:22:55+5:30

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार अनुकूल असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले.

Maratha reservation government friendly | मराठा आरक्षणास सरकार अनुकूल

मराठा आरक्षणास सरकार अनुकूल

googlenewsNext


बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार अनुकूल असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले. नारायणगडावर शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उघडण्याची घोषणाही त्यांनी केली.
रविवारी श्रीक्षेत्र नारायणगड येथे नगद नारायण महाराज यांचा द्विशताब्दीपूर्ती पुण्यतिथी व महंत शिवाजी महाराज यांच्या एकषष्टीनिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. विनायक मेटे होते. यावेळी माजी खा. रजनी पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, माजी आ. राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, सिराज देशमुख, आदिनाथ नवले, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, अशोक हंगे, प्रा. सुशीला मोराळे यांच्यासह लक्ष्मण महाराज मेंगडे व संत महंत उपस्थित होते.
यावेळी नगद नारायण महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. एकषष्टीनिमित्त मठाधिपती शिवाजी महाराज यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला. मानपत्राचे वाचन देवयानी गोरे हिने केले.
रणजित पाटील म्हणाले, नारायणगडाला अध्यात्माची मोठी परंपरा आहे. गडाच्या मातीत मनोकामना पूर्ण करण्याची ताकद आहे. मला अचानक या कार्यक्रमास उपस्थित राहावे लागले, हे माझे सुदैवच म्हणावे लागेल. नापिकी, दुष्काळ, पाणी-चारा टंचाई हे प्रश्न सध्या गंभीर आहे; मात्र या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यावे लागेल. शेतीच्या जोडीला कौशल्य हवेच, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी शेतीच्या मालाला दाम व तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे असे सांगितले.
शाश्वत विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येत्या तीन वर्षांत उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले. गडाच्या ५०० एकर जमिनीचे प्रकरण प्रलंबित आहे. ही जमीन गडाच्या मालकीची होण्यासाठी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
तत्पूर्वी, गडाचे विश्वस्त दिलीप गोरे यांनी प्रास्ताविक केले. माजी आ. राजेंद्र जगताप यांनी नारायण भक्तिपीठ तर रायगड शक्तिपीठ असल्याचा उल्लेख केला. जि.प. अध्यक्ष पंडित म्हणाले, गडाच्या विकासासाठी पंडित कुटुंबीय सदैव तत्पर राहील. लक्ष्मण महाराज मेंगडे म्हणाले, गडाने वारकरी संप्रदायाचा प्रसार-प्रचार करण्यात मोठा वाटा उचलला आहे. गडाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी सरसावले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खा. पाटील यांनी सांगितले की, एकेकाळी मरगळलेल्या समाजाला नवसंजीवनी देण्याचे काम संत-महंतांनी केले आहे. संतांची भूमिका जीपीआरएससारखी आहे. संत भक्तांना नेहमी योग्य ते मार्गदर्शन करतात. गडाच्या विकासासाठी आतापर्यंत २५ लाख रुपये दिले आहेत. बीड येथे गडाची साडेतीन एकर जागा आहे. या जागेत मुला-मुलींच्या शिक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या केंद्राला व गडाच्या इतर विकासासाठी ७५ लाख रुपये असे मिळून खासदार निधीतून १ कोटी देण्याची घोषणा त्यांनी केली.
आ. मेटे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाही, असे स्पष्ट केले. रणजित पाटील हे नागपूरचे असून, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठविल्याचे सांगितले. जिल्ह्यात गडाचे प्रस्थ वाढत आहे. सामाजिक समतेचा संदेश नारायणगडावरून दिला जातो. हा गड पक्ष, जात, गट मानत नाही, असे स्पष्ट करून निमंत्रण पत्रिकेत सर्व आजी-माजी आमदार, मंत्री व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले; मात्र काही जण आले नाहीत. गड येणाऱ्यांना आशीर्वाद देतोच; पण न येणाऱ्यांना जास्तच आशीर्वाद देतो, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत बीडच्या प्रचाराचा नारळ नारायणगडावर फोडला होता. त्याला देवेंद्र फडणवीस आले होते. आता ते मुख्यमंत्री झाले आहेत, अशी आठवणही त्यांनी करून दिली. नारायणगडाच्या विकासासाठी ६० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. हा आराखडा एक महिन्यात मंजूर करण्यात येईल. आराखडा मंजूर करूनच गडावर पाऊल ठेवीन, अशी प्रतिज्ञा मेटे यांनी यावेळी केली.
गडाचा विकास व हितासाठी बांधील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. बीडमधील साडेतीन एकरात उभारण्यात येणाऱ्या केंद्रातून शेतकऱ्यांची मुले घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाले; मात्र न्यायालयात आता आरक्षण न्यायालयात अडकले आहे. हा प्रश्नही लवकर मार्गी लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पुण्यतिथी सोहळा दरवर्षी घेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी महंत शिवाजी महाराज यांचे भाषण झाले. विश्वस्त अ‍ॅड. महादेव तुपे यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maratha reservation government friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.