आरक्षण न मिळाल्यास महायुतीमधून बाहेर पडण्याचा व सोबत राहण्याचाही विषय नाही : विनायक मेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:53 PM2018-11-23T13:53:16+5:302018-11-23T13:54:27+5:30
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास महायुतीमधून बाहेर पडणार का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, त्यासाठीच संघटनेचा निर्धार मेळावा आहे.
औरंगाबाद : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर महायुतीमधून बाहेर पडण्याचा व सोबत राहणायाचाही विषय नाही त्यासाठीच जानेवारी महिन्यात शिव संग्राम संघटनेचा निर्धार मिळावा आहे अशी भूमिका अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.
जानेवारी महिन्यात शिवसंग्राम संघटनेचा १७ वा वर्धापन आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास महायुतीमधून बाहेर पडणार का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, त्यासाठीच संघटनेचा निर्धार मेळावा आहे.
यासोबतच मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र असून हा समाजाचा हक्क आहे. मराठा समाजास आरक्षण न देणे सरकारला परवडणारे नाही असा इशाराही मेटे यांनी यावेळी दिला. मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मिळविण्यात पात्र आहे. ओबीसीत समाजाचे आरक्षण बाधीत न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
सरकारने समाजाचे प्रश्न सोडवले
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ६०० कोर्सला शिष्यवृत्ती, आरक्षणासाठी आयोगाची शिफारस, शिव स्मारक असे अनेक प्रश्न या सरकारने मार्गी लावले आहेत अशी माहितीसुद्धा मेटे यांनी दिली.
भाजप बाबत खंत
भाजपने आमची एकही राजकीय मागणी पूर्ण केली नाही याची खंत आहे परंतु मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या याचा आनंद आहे असेही ते यावेळी म्हणाले.