पुन्हा सलग नऊ दिवस उपोषणामुळे मनोज जरांगे यांचे १२ किलो वजन घटले
By बापू सोळुंके | Published: November 4, 2023 03:33 PM2023-11-04T15:33:15+5:302023-11-04T15:34:49+5:30
प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील यांना दिवाळीतही राहावे लागणार रुग्णालयात
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सप्टेंबर महिन्यात १७ दिवस उपोषण केल्यानंतर सव्वा महिन्यातच सलग ९ दिवस दुसरे उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे - पाटील यांची प्रकृती खालावली. यामुळे गुरुवारी रात्री त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांना उलट्याही झाल्या. आता त्यांना ठणठणीत होण्यासाठी दिवाळीपर्यंत दहा ते बारा दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे - पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात सलग १७ दिवस उपोषण केले होते. शासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी ४० दिवस उपोषण स्थगित केले होते. शासनाने मागणी पूर्ण न केल्याने जरांगे - पाटील यांनी २५ ऑक्टोबरनंतर सलग नऊ दिवस उपोषण केले. यातील काही दिवस त्यांनी पाणीही न प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. यामुळे गुरुवारी रात्री त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून डॉ. विनोद चावरे आणि डॉ. अमोल खांडे हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत.
त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना डॉ. अभिमन्यू माकणे यांनी सांगितले की, जरांगे - पाटील यांनी त्यांच्या सप्टेंबरमधील उपोषणानंतर आराम न करता राज्यभर दौरे आणि सभा घेतल्या. यानंतर २५ ऑक्टोबरपासून सलग दुसरे उपोषण केल्याने त्यांचे सुमारे १२ किलो वजन घटले. पाणी न प्यायल्यामुळे त्यांच्या शरीरातील स्नायूही आकुंचन पावत होते. रात्रीपासून आम्ही त्यांच्यावर उपचार सुरू केले. शुक्रवारी दुपारी त्यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यांना पूर्णपणे ठणठणीत होण्यासाठी पुढील दहा ते बारा दिवस रुग्णालयात राहावे लागेल.
जरांगे यांना भेटण्यासाठी गर्दी
जरांगे हे रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच, छत्रपती संभाजीनगर शहरातील समाजबांधव आणि अंतरवाली सराटी येथील गावकऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी त्यांची भेट घेतली. शिवाय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही रुग्णालयासमोर ठाण मांडून आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांना काेणालाही भेटायला मनाई केली आहे. शिवाय त्यांच्या संरक्षणासाठी दोन बाऊन्सर तेथे नियुक्त केले आहेत.