Maratha Reservation : 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'च्या डॉ. काबरा विरूध्द मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:11 PM2021-05-28T17:11:46+5:302021-05-28T17:16:16+5:30
Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणाऱ्या 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'ला फंडिंग केल्याचा आरोप
औरंगाबाद: मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल करणाऱ्या 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' चळवळीला फंडिंग केल्याचा आरोप करीत डॉ. प्रवीण काबरा यांना काळे फासण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ९ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. काबरा हॉस्पिटल येथे हे आंदोलन झाले.
सुनील कोटकर, रवि कळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय सावंत, भरत कदम , संतोष गायकवाड, गणेश उगले पाटील , निलेश ढवळे , पंढरीनाथ गोडसे , दत्तात्रेय घारे अशी आंदोलनकर्त्यांची नावे आहेत. याविषयी सुनील कोटकर आणि रवींद्र काळे यांनी सांगितले की, मराठा समाज सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा शांतताप्रिय समाज आहे. असे असतांना मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत आरक्षण मिळाल्यावर 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' ही चळवळ उभी राहिली. या चळवळीतर्फे नागपूर खंडपीठ येथे मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल केली. ऐवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरण होते. तेव्हा आरक्षणाला विरोध करणाऱ्यामध्ये 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'ची याचिका होती. त्यांनी लाखो रुपये खर्चून मराठा आरक्षणाला विरोध केला. यामुळे आरक्षणाचा कायदा रद्द झाला. 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'ला आर्थिक रसद पुरविणाऱ्या लोकांची यादी आमच्या हाती लागली. औरंगाबाद शहरातील काबरा हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण काबरा यांचा यात समावेश आहे. यामुळे आज मराठा क्रांती मोर्चातर्फे त्यांना जाब विचारून काळे फासणार होता. आम्ही आंदोलंकर्ते त्यांच्या हॉस्पिटलजवळ असतांना पोलिसांनी आम्हाला पकडले.
पोलिसांनी नोंदविला गुन्हा
महेशनगर येथील डॉ. काबरा यांच्या रुग्णालयात मराठा क्रांती मोर्चाचे लोक जाणार असल्याचे कळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, फौजदार हारुण शेख, हवालदार सानप, राठोड आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनापूर्वीच बंदोबस्त लावला. कार्यकर्ते येताच पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी एक मराठा,लाख मराठा, डॉक्टर काबरा विरोधात घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर गुन्हा नोंदविला.