मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने मंत्री दानवे , भुमरे यांच्या बंगल्यासमोर वाजविले ढोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 02:04 PM2020-09-17T14:04:32+5:302020-09-17T14:05:22+5:30
आरक्षणाला मिळालेली स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा या त्यासाठी मराठासमाजाने आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
औरंगाबाद: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे गुरुवारी सकाळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगित केले. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मराठा समाजाच्या उमेदवारांना नोकरीच्या राखीव जागापासून लागत आहे. मराठा समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे हे राज्य मागास आयोगाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. असे असताना मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काढून घेण्यात आले. आरक्षणाला मिळालेली स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा या त्यासाठी मराठासमाजाने आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. या अंतर्गत आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शिवाजीनगर परिसरातील निवासस्थान येथे आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्या गारखेडातील निवासस्थानासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन केले. या आंदोलनात किरण काळे ,मनोज पाटील मुरदारे, शुभम केरे ,पंढरीनाथ गोडसे ,भरत कदम ,लक्ष्मण मोटे,सतीश बचाटे, आप्पासाहेब जाधव आदींचा सहभाग होता.
आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा
आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस उपायुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळुंखे ,पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक निरीक्षक श्रध्दा वायदंडे , सपोनि सुनील कराळे , उपनिरीक्षक भरत पाचोळे ,विजय पवार ,प्रभाकर सोनवणे , विनायक कापसे, वाघ , यांच्यासह मोठा तैनात करण्यात आला होता.