आरक्षण लढ्यात सोबत असू शकतो, पण मनोज जरांगेंना नेता मानत नाही: पुरुषोत्तम खेडेकर

By स. सो. खंडाळकर | Published: January 20, 2024 01:46 PM2024-01-20T13:46:37+5:302024-01-20T13:46:56+5:30

मराठा-ओबीसी एक झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. - ॲड. पुरुषोत्तम खेडेकर

Maratha Reservation may be along in the fight, but Manoj Jarange doesn't consider him a leader: Purushottam Khedekar | आरक्षण लढ्यात सोबत असू शकतो, पण मनोज जरांगेंना नेता मानत नाही: पुरुषोत्तम खेडेकर

आरक्षण लढ्यात सोबत असू शकतो, पण मनोज जरांगेंना नेता मानत नाही: पुरुषोत्तम खेडेकर

छत्रपती संभाजीनगर : ३५ वर्षांपासून मराठा सेवा संघाने संवैधानिक मार्गाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही मागणी लावून धरलेली आहे. या मागणीसाठी आम्ही मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत असू शकतो. परंतु आम्ही त्यांना नेता मानत नाही’, असे शुक्रवारी मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.

१६ जानेवारीपासून ते जनसंवाद दौरा करीत आहेत. हिंगोली, परभणी व नांदेडचा दौरा करून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. ३१ जानेवारीपर्यंत त्यांचा हा दौरा मराठवाड्यातील चार जिल्हे व संपूर्ण विदर्भात होणार आहे.

त्यांनी सांगितले की, मराठा व ओबीसी हा संघर्ष टाळला गेला पाहिजे. ओबीसींच्या मनातील भीती घालवली गेली पाहिजे. किंबहुना मराठा-ओबीसी एक झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात खेडेकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेड हा आमचा राजकीय पक्ष आहे. ऑगस्ट २०२२ सालीच आमची शिवसेना उबाठाबरोबर युती झाली आहे. आता लोकसभेच्या चार-पाच जागांची आम्ही उबाठा शिवसेनेकडे मागणी केली आहे. हिंगोली व बुलडाणा मतदारसंघावर आमचा प्रबळ दावा आहे.

८१ कोटी लोकांना मोफत धान्य का द्यायचे? हा खरा प्रश्न आहे. त्याच्या मोबदल्यात काही काम करवून घ्या, अशी आमची मागणी आहे. शिवाय यामागे काही राजकारण असू शकेल, अशी शंका आम्हाला वाटते, असा संशयही खेडेकर यांनी व्यक्त केला. ओबीसीतील वंचितांनाही अबकडची व्यापी वाढवून आरक्षण मिळावे. त्यांचा वाटा त्यांना मिळायलाच पाहिजे, परंतु यासाठी आमचे आम्हाला मिळू नये, असे नाही, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

त्यांनी सांगितले की, गुण्यागोविंदाने नांदणारा समाज आज अस्वस्थ जाणवतोय, दुरावा निर्माण होतोय. पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळी पूर्वी सोबत होत्या. आता त्यांच्यातही दुरावा जाणवतोय? सरकारी योजना फसव्या वाटत आहेत. सरकारी दवाखान्यात डॉक्टरही नाही, औषधीही नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत. राजकारणातही कुठेही स्थिरता नाही. चंद्रशेखर शिखरे, प्रा. शिवानंद भानुसे, विंग कमांडर टी. आर. जाधव, धनंजय पाटील, भाऊसाहेब शिंदे व वैशाली कडू आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Maratha Reservation may be along in the fight, but Manoj Jarange doesn't consider him a leader: Purushottam Khedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.