मराठा आरक्षण आंदोलन: मराठवाड्यात धग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:45 AM2018-07-26T01:45:59+5:302018-07-26T01:46:32+5:30
हिंगोली, नांदेड, उस्मानाबादला गुन्हे दाखल
औरंगाबाद : काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीनंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये हिंसेचा उद्रेक झाला. त्यानंतर बुधवारीही मराठवाड्यात आंदोलनाचा निखारा धुमसतच होता. गेवराईत आमदारांच्या घरासमोर तसेच भाजपा संपर्क कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. हिंगोली, जालना, नांदेड जिल्ह्यात ठिय्या, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले. उस्मानाबादेत ५० ते ६० आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
गेवराईत भाजपाचे आ. लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनादरम्यान ‘मराठा आरक्षणासाठी आमदारांनी ठराव मांडावा’ अशी मागणी केली. आ. पवार घराबाहेर येऊन काही बोलणार तोच पोलिसांच्या दिशेने दगडफेक झाली. जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करण्यात आला. परळीत आठव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , काँग्रेस नेते आ. भाई जगताप, आ. अब्दुल सत्तार, अ. भा. कॉँग्रेस कमेटीचे सदस्य तथा राज्य सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे आदींनी आंदोलकांची भेट घेतली. जालना जिल्ह्यात भोकरदन येथे सामूहिक मुंडण करून शासनाचा निषेध करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात दगडफेक प्रकरणी ३०० वर आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
नांदेड येथे मंगळवारी आंदोलनादरम्यान पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांच्यासह डॉ. स्मिता कदम आणि काही तरूणांना मारहाण केली़ त्याविरोधात बुधवारी आ. हेमंत पाटील, आ़ नागेश पाटील आष्टीकर, आ़ सुभाष साबणे यांनी रास्ता रोको करीत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली़ भाजपाचे लोदगा (जि. लातूर) पंचायत समितीचे सदस्य जनार्दन रतन कास्ते यांनी बुधवारी सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला.
साता-यात लाठीमार, अश्रुधूर
सातारा जिल्ह्यात आंदोलकांनी मंगळवारी दुपारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तुफान दगडफेक केली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. तसेच अश्रूधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह पाच पोलीस जखमी झाले. सांगलीत ‘जलसमाधी आंदोलन’ करण्यात आले. नदीपात्रात पोलीस, अग्निशमनचे कर्मचारी व पोहणारे युवकही थांबले होते. घोषणा देत सुमारे तासभर कार्यकर्ते नदीपात्रातच बसून होते.