आंदोलन चिघळण्यामागे नेमकं कोण? मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

By राम शिनगारे | Published: September 2, 2023 02:13 PM2023-09-02T14:13:52+5:302023-09-02T14:20:06+5:30

''काल सरकारने आंदोलन मोडीत काढले, आमच्यावर गोळीबार झाला आता बॉम्बफेक केली तरी माघार नाही''

Maratha Reservation 'No retreat even if bombed now'; Live interaction with Manoj Jarange | आंदोलन चिघळण्यामागे नेमकं कोण? मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

आंदोलन चिघळण्यामागे नेमकं कोण? मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

googlenewsNext

अंतरवली सराटी येथून  ग्राउंड रिपोर्ट :जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण करणाऱ्यांना उपचारासाठी नेण्याच्या कारणावरून शुक्रवारी दुपारी निर्माण झालेल्या वादातून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू होताच आंदोलकांनी दगडफेक केली. यात पोलीस आणि आंदोलक जखमी झाले आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांडे हे करत आहेत. त्यांनी आज देखील उपोषण सुरूच ठेवले आहे.  मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला असतानाही आंदोलन का? नेमकी घटना का घडली? यावर जरांडे यांच्याशी साधलेला थेट संवाद.

प्रश्न. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन कशासाठी?
उत्तर- आम्ही न्याय प्रविष्ट आरक्षणाचा विषय घेतलेला नाही. मराठवाड्यातील मराठ्यांना पूर्वीपासून हैदराबाद संस्थानात आरक्षण होते. तेच देण्याची आमची मागणी आहे. हे न्यायप्रविष्ट असेल तर मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत केली नसती. विदर्भातील मराठ्यांच्या पूर्वीपासून मराठवाड्यात आम्हाला आरक्षण होते.

प्रश्न. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरु का ठेवले?
उत्तर- मुख्यमंत्री शिंदे यांनी ओफ्न केला, ते म्हणाले मी आरक्षण देतो, आंदोलन करयाची गरज नाही. मी शिंदे साहेबांना सांगितले, तुमच्या समितीने अहवालच दिला नाही. तीन महिन्याचे मुदत त्यांनी पाळली नाही. तेव्हा ते हादरले. याबाबत समितीकडून तत्काळ माहिती घेऊन फोन करतो म्हणत मुख्यमंत्र्यांनी फोन ठेवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फोन केला नाही अन तासाभरांनी आमच्यावर हल्ला झाला.

प्रश्न. पोलीस म्हणतात, तुमची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात नेणे गरजेचे होते?
उत्तर- मी आज तुमच्याशी बोलतोय, म्हणजे माझी तब्येत खालावली कशी? तरी मी काल एसपींना सांगितले तुम्हाला जे उपचार करायचे ते करा. त्यांनी डॉक्टर आणले. मला पाणी देखील पिण्यास लावले. इतके झाल्यानंतर एसपी म्हणाले मी चालो. त्यानंतर अचानक ५०० पोलिसांचा ताफा आला अन त्यांनी आमच्यावर हल्ला केला. 

प्रश्न. आंदोलन चिघळले कसे?
उत्तर- हे पोलिसांनी, सरकारने चिघळले. यांना मराठ्यांना काहीच देयचे नाही. यामुळे जाणूनबुजून यांनी आंदोलन मोडण्याच्या प्रयत्न केला. पण आमच्या गावातील सर्व जाती धर्मातील लोक, राज्यातील मराठा बांधव आमच्या पाठीशी एकवटला. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.  

प्रश्न. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस म्हणतात, आधी आंदोलकांनी दगडफेक केली. खरे काय?
उत्तर- मुख्यमंत्री पदी राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना बेछूट आरोप करणे शोभत नाही. मराठ्यांनी यांना १०६ आमदार दिले अन हे पोलिसांची बाजू घेतात. त्यांच्या आईच्या, बापाच्या वयाच्या आंदोलकांचे हातपाय मोडले, लहान मुलांचे हातपाय मोडले यावर ते बोलत नाहीत. माझ्या पोलिसांवर हल्ला केल्याचे म्हणता, तुम्हाला १०६ दिले ते मराठे तुम्हाला ५ वर आणून ठेवतील. आमच्यावरील गुन्हे आणि बोललेले शब्द मागे घ्यावेत, नसता फडणवीस आणि पोलिसांना मराठ्यांच्या रोषाला बळी पडावे लागले.  

प्रश्न. पोलीसांनी गोळीबार केलाय का?
उत्तर- ही बघा गोळी. ( जवळील रिकामी बुलेट दाखवतात). आमच्याकडे काही बुलेटचा कारखाना नाही ?

प्रश्न. यात कोण जखमी झाले?
उत्तर- १५० पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. काही दवाखान्यात आहेत, काही इथे आहेत.

प्रश्न.तुमचे आंदोलन किती दिवस चालणार?
उत्तर- आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. काल त्यांनी गोळीबार केला. तुम्हाला गोळ्या दाखवल्या. आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही. आमची लढाईची तयारी आहे.

कोण आहेत मनोज जरांगे पाटील 
मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही पक्षाशी निगडित नाहीत. 2011 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत. त्यांनी शिवबा संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणासाठी 2012 छ्त्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तालयवर मोर्चा काढला. त्यानंतर मराठा 2013 साली शहागड ते मंत्रालय पायी 60 किमी मार्च केला. 2015 ते 2023 पर्यंत त्यांनी मराठा आरक्षणासाठी सातत्याने 30 च्यावर आंदोलने केली.

Web Title: Maratha Reservation 'No retreat even if bombed now'; Live interaction with Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.