Video: मराठा आरक्षण आंदोलकांची घोषणाबाजी; दानवेंची प्रचार सभा गुंडाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:26 PM2024-05-08T18:26:41+5:302024-05-08T18:27:43+5:30
आत्तापर्यंत रावसाहेब दानवे हे कधीच घाटनांद्रा गावात आले नाहीत. इतरही कोणत्याच सुख, दुःखात ते सामील होत नाहीत, विकास कामे करणे तर दुरचीच गोष्ट आहे, असा संताप यावेळी उपस्थित तरूणांनी व्यक्त केला.
घाटनांद्रा (छत्रपती संभाजीनगर) : मराठा आरक्षण आंदोलकांनी गोंधळ घातल्याने जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे मंगळवारी रात्री आयोजित सभा अर्ध्या तासातच गुंडाळण्याची नामुष्की आयोजकांवर आली.
जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ घाटनांद्रा येथे मंगळवारी रात्री ८ वाजता उमेदवार दानवे आणि अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रचार सभा आयोजित केली होती. रात्री ९ च्या सुमारास सभा सुरू झाली. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास इतर पाहुण्यांचे सभास्थळी आगमन झाले. त्यानंतर काही तरुणांनी सत्तार व दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘एक मराठा लाख मराठा, अशा प्रकारच्या घोषणा देऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
आत्तापर्यंत रावसाहेब दानवे हे कधीच घाटनांद्रा गावात आले नाहीत. इतरही कोणत्याच सुख, दुःखात ते सामील होत नाहीत, विकास कामे करणे तर दुरचीच गोष्ट आहे, असा संताप यावेळी उपस्थित तरूणांनी व्यक्त केला. यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. या तरूणांना काही नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या गोंधळातच सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सिल्लोडचे उपनगराध्यक्ष शेख समीर अब्दुल सत्तार, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, दिलीप दानेकर, विजय औताडे, राष्ट्रवादीचे नेते ठगनराव भागवत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे आदींनी थोडक्यात भाषण केल्यानंतर अर्ध्या तासातच प्रचार सभा गुंडाळण्यात आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दानवे व सत्तार हे सभास्थळी आलेच नाहीत.
दानवेंच्या प्रचार सभेत मराठा आरक्षण आंदोलकांचा गोंधळ, सभा अर्ध्या तासातच गुंडाळण्याच्या नामुष्की, सिल्लोड तालुक्यातील घटना #LokSabhaElections2024#JalanaLoksabhapic.twitter.com/DszHObdiyV
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 8, 2024
स्नेहभोजनाचा कार्यक्रम बारगळला
प्रचारसभा झाल्यानंतर आयोजकांनी ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार स्वंयपाकही तयार करण्यात आला होता; परंतु सभास्थळी गोंधळ झाल्याने आयोजकांना अर्ध्या तासातच सभा गुंडाळावी लागली. त्यामुळे स्नेहभोजनाचा कार्यक्रमही बारगळला बहुतांश ग्रामस्थांनी स्नेहभोजनाकडे पाठ फिरवली.