मराठा आरक्षणप्रश्नी मोर्चा
By Admin | Published: November 17, 2014 12:24 PM2014-11-17T12:24:28+5:302014-11-17T12:26:57+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी मराठा व मुस्लिम समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने जिल्हा कचेरीवर १९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे.
परभणी: मराठा समाजाच्या आरक्षणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी मराठा व मुस्लिम समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने जिल्हा कचेरीवर १९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे.
आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षण प्रश्नाबाबत आपली बाजू न मांडल्याने उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रश्नी मराठा व मुस्लिम समाजाच्या भावना तसेच कर्तव्याची जाणीव सरकारला करुन देण्यासाठी सर्व संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व सुभाष जावळे, अँड.विष्णू नवले पाटील, रामेश्वर शिंदे, धाराजी भुसारे हे करणार आहेत. मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण राज्य शासनाने दिले होते. येत्या ५ जानेवारी रोजी याबाबत पुढील सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयातील ही स्थगिती उठविण्यासाठी सरकारला जाणीव करुन देण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहेत.
या मोर्चात समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, रामेश्वर आवरगंड, बालाजी मोहिते, नितीन देशमुख, रामदास अवचार, भानुदास शिंदे, अँड. अमोल देशमुख, नारायण देशमुख आदींनी केले आहे.