MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू

By बापू सोळुंके | Published: September 9, 2024 08:15 PM2024-09-09T20:15:58+5:302024-09-09T20:16:21+5:30

१७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाडकी बहिण दिसणार नाही: राजश्री उंबरे

Maratha Reservation: September 17 ultimatum upheld; Rajshree Umber's fast continues on the eighth day | MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू

MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यासाठी उपोषणास बसलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्याच्या राजश्री उंबरे यांची आज सोमवारी खासदार संदीपान भुमरे यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा १७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाडकी बहिण दिसणार नाही, असे उत्तर देत उंबरे यांनी आठव्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले.

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, हैदराबाद संस्थानाचे गॅझेट लागू करावे, शेतकरी,शेतमजूर आणि कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे आदी प्रमुख मागण्यासाठी २ सप्टेंबरपासून राजश्री उंबरे या क्रांतीचौक येथे उपोषण करीत आहेत. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर त्यांनी पाणी प्राशन केले होते. काल पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपचार घेण्याची तयारी दर्शविली. 

दरम्यान, आज सोमवारी सायंकाळी खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे ,अशा घोषणा दिल्या. यावेळी भुमरे यांनी संघटनेच्या सर्व मागण्या शासनाला कळविण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र १७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तुम्हाला तुमची ही लाडकी बहिण दिसणार नाही, असा इशारा  देत राजश्री यांनी त्यांचे उपोषण आठव्या दिवशीही सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

Web Title: Maratha Reservation: September 17 ultimatum upheld; Rajshree Umber's fast continues on the eighth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.