मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:55 AM2024-09-16T09:55:39+5:302024-09-16T09:56:08+5:30
छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु होते.
Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या विकासासाठी अन्य विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित करीत असल्याचे घोषित केले.
मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन त्यांनी आपले उपोषण थांबवले. १४ दिवसानंतर हे उपोषण त्यांनी स्थगित केले. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल सायंकाळी उपोषण स्थळी जाऊन उंबरे यांची भेट घेतली.
दीपक केसरकर यांनी उंबरे यांच्या मागण्यानिहाय प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा करुन राजश्री उंबरे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शंकानिरसन केले. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत माहिती दिली. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेनंतर उंबरे यांनी आपण उपोषण स्थगित करीत असल्याचे स्वतः माध्यमांना सांगितले.
शिष्टमंडळाने घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट
राजश्री उंबरे यांच्या वतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. त्यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं होतं.