शासनाच्या शिष्टमंडळाच्या भूमिकेवरच आंदोलनाची दिशा ठरणार; उपोषणकर्त्या राजश्री उंबरे
By बापू सोळुंके | Published: September 14, 2024 04:54 PM2024-09-14T16:54:25+5:302024-09-14T16:55:53+5:30
आमच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली. मात्र, शासनाने लेखी असे कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.
छत्रपती संभाजीनगर: शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उद्या रविवारी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्यासाठी शासनाकडून लेखी आश्वासन काय मिळते, यावरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे उंबरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. १७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १८ ला आपण राहणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.
हैदराबाद संस्थानचे गॅझेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, ईडब्ल्यूएस आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि शेतकरी,शेतमजूर ,कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, यामागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्यावतीने राजश्री उंबरे या २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात उपोषण करीत आहेत. शनिवारी त्यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस होता. त्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर आज शिष्टमंडळाने पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका जाहिर केली.
उमरे म्हणाल्या की, आमच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली. मात्र, शासनाने लेखी असे कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. उद्या रविवारी मंत्री दिपक केसरकर आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार हे सरकारच्यावतीने भेटण्यासाठी येणार आहे. मागण्यासदंर्भात सरकार काय निर्णय घेते, यावरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे उमरे यांनी नमूद केले.
संघटनेचे प्रवक्ता प्रवीण नागरे म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवरून ते आमच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक वाटले.परंतु धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, आता त्यांचे मंत्री तुमच्या मागण्या मान्य करतील असे वाटते का, या प्रश्नाचे उत्तर देताना नागरे म्हणाले सरकार वेळकाढूपणा करतेय असे वाटते. म्हणूनच आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवले आहे.