Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फेसबुकवर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 10:48 AM2018-07-30T10:48:50+5:302018-07-30T11:26:44+5:30
मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक समाज बांधव आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. औरंगाबादमध्येही आज अशीच एक घटना समोर आली असून मुकुंदवाडी परिसरात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुकुंदवाडी रेल्वे गेट क्रमांक 51 येथे रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा प्रकार कळताच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी बंदची हाक दिली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याची माहिती फेसबुकवर जाहीर केली होती.
प्रमोद पाटील हा तरुण मराठा समाजातून येत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षणा नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता, अशी माहिती मिळते. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी (29 जुलै) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी करा… मराठा आरक्षणासाठी करा जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील…’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट 4.50 वाजता पोस्ट करत त्यात मराठा आरक्षण जीव जाणार असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. अखेर मध्य रात्री मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मुकुंदवाडीतील, रास्ता रोको, बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. औरंगाबाद- जालना मार्ग बंद झाला आहे. या भागातील वातावरण तणावपूर्ण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
जालना व बीड कडे जाणारी वाहतूक प्रभावित
सिडको बस स्थानकापासून पुढे जालना आणि बीडकडे जाणारी वाहतूक मुकुंदवाडी येथील रास्तारोकोमुळे प्रभावित झाली आहे. पोलिसांनी शहरातील एपीआय कॉर्नर येथून वाहतूक वळवली आहे. तसेच जालना रोडवर करमाड येथे वाहने थांबविण्यात आले आहेत. या ठिकाणी ४ बस पोलिसांनी रोखून धरल्या आहेत. बीडबायपास केंब्रीज स्कूलमार्गे शहरात येणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (३८) याने रविवारी (29 जुलै) दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या निषेधार्थ भोकरफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. माहिती मिळताच तहसीलदार डॉ़अरविंद नरसीकर, पोलीस तसेच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़ कचरू हा सुशिक्षित होता. तो हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करायचा. त्याच्या पश्चात तीन मुली, पत्नी व वयोवृद्ध आई असा परिवार आहे.