छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

By बापू सोळुंके | Published: August 26, 2022 06:44 PM2022-08-26T18:44:22+5:302022-08-26T18:46:58+5:30

छत्रपती संभाजी राजें यांनी त्यांचा राजकीय पक्ष चालवावा, मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

Maratha society does not want the leadership of Chhatrapati Sambhaji ; demand of Maratha Kranti Morcha | छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

googlenewsNext

औरंगाबाद: मराठा समाजाच्या प्रश्नांसंबंधी शासनाने गुरूवारी बोलविलेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना माजी खासदार छत्रपती संभाजी राजेंनी बोलू दिले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचीच स्तूती ते करताना दिसले. आम्ही छत्रपतींच्या गादीचा सन्मान करतो, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही,अशी रोखठोक भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली.

क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. शिवानंद भानूसे म्हणाले की, मुंबईच्या बैठकीसाठी औरंगाबादेतून सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ आणि स्वत: भानुसे यांना बोलावण्यात आले होते. कोटकर, भराट आणि वेताळ यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही. बैठकीच्या सुरवातीलाच छत्रपती संभाजी राजेंनी बैठकीत कोणीही बोलू नका, अन्यथा मी बैठक सोडून निघून जाईल असे सांगून प्रत्येकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. ते केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीच स्तूती करताना दिसत होते. यामुळे आम्ही संभाजी राजेंचा निषेध करतो. छत्रपती संभाजी राजें यांनी त्यांचा राजकीय पक्ष चालवावा, मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. बैठकीत मराठा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवून केवळ सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला मुबलक निधी देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र किती निधी देणार हे जाहिर केले नाही. 

रविंद्र काळे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चात फुट पाडली. यामुळे आरक्षण उपसमितीत चंद्रकांत पाटील यांचा समावेश करू नका, अशी मागणी केली. प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी बैठक असल्याचे सांगून बैठकीसाठी मुंबईला बोलावले मात्र बैठकीत प्रवेश दिला नाही. मराठवाड्यातील जनतेला आरक्षणाची खरी गरज असताना मराठा आरक्षणावर कोणतीही चर्चा या बैठकीत न होणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. सुनील कोटकर म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मेटे यांचाही बळी गेला. आणखी किती बळी शासनाला हवे आहेत असा सवाल केला. यावेळी सुरेश वाकडे, अरूण नवले, सुकन्या भोसले, रवींद्र वाहटुळे आदींची उपस्थिती होती.

कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांनी शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील उच्च न्यायालयात पडून आहेत. विशेष न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी आमची मागणी असल्याचे रेखा वाहटुळे यांनी सांगितले.

Web Title: Maratha society does not want the leadership of Chhatrapati Sambhaji ; demand of Maratha Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.