मुक्तीसंग्राम दिनी मराठा समाज लावणार घरावर काळे झेंडे, कार्यक्रमावर बहिष्काराचा इशारा
By बापू सोळुंके | Published: September 11, 2023 01:51 PM2023-09-11T13:51:59+5:302023-09-11T13:53:37+5:30
सकल मराठा समाजाच्यावतीने आज विभागीय आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने 17 सप्टेंबर रोजी घरावर काळे झेंडे लावण्याचा आणि ध्वजारोहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याविषयीची निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयास देण्यात आले.
मराठा आरक्षण मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे हे उपोषण सोडवण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरक्षण देण्याचा जीआर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही तसेच आंदोलकावर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करावी, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने त्यांचे उपोषण आज १४ व्या दिवशीही सुरू आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभर मराठा समाजा कडून पाठिंबा मिळत आहे. विविध ठिकाणी उपोषण लाक्षणिक, बंद, धरणेआंदोलन, रस्ता रोको, स्वतःची वाहने जाळणे, आदी प्रकारचे आंदोलन होत आहे .या पार्श्वभूमीवर शहरातील सकल मराठा समाज पुन्हा एकदा मराठा समाज एकवटला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने आज विभागीय आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा आणि घरावर काळे झेंडे लावण्याचा इशारा देण्यात आला .यावेळी प्राध्यापक चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सुकन्या भोसले, डॉ. दिव्या मराठे, सुवर्णा मोहिते पाटील, रेखा वहाटुळे आदींची उपस्थिती होती.