मराठी असे आमुची मायबोली; ‘पुस्तकांचे गाव’ होणार औरंगाबादेतील वेरूळमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 02:32 PM2022-03-26T14:32:44+5:302022-03-26T14:35:01+5:30
पुस्तकांच्या खपात लौकिक असल्याने झाला समावेश
- विकास राऊत
औरंगाबाद : ‘हे ऑन वे’ या वेल्स इंग्लंडमधील गावाच्या धर्तीवर राज्यात ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली असून, औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळमध्ये ‘पुस्तकांचे गाव’ होणार आहे. वेरूळ ग्रामपंचायत अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला ‘पुस्तकांचे गाव’ करण्यास शासनाने शुक्रवारी मान्यता दिली आहे.
पुस्तकाचे गाव उपक्रमासाठी शासनाने डिसेंबर २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत योजनेच्या विस्ताराला आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी भाषा विभागाने याबाबत जानेवारी २०२२ मध्ये अध्यादेश जारी केला आहे. त्यानंतर २५ मार्च रोजी सहा महसुली विभागातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून निवड केल्याचे शासनाने जाहीर केले.
‘मराठी वाचा आणि वाचवा’ यासाठी २०१७ पासून सुरू असलेली ही योजना व्यापक करण्यात आली आहे. ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेचे आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी, या उद्देशाने ही संकल्पना पहिल्या टप्प्यात मूर्त रुपात आणली आहे.
यामुळे झाली वेरूळची निवड
पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र, वाङ्मय, साहित्य चळवळ, ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्ये, कृषी पर्यटन, पुस्तकांच्या खपात लौकिक असलेल्या गावांचा योजनेत समावेश होईल. या पूर्ण निकषात वेरूळचा समावेश होतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलेे घृष्णेश्वर देवस्थान, जगप्रसिद्ध लेण्यांमुळे वेरूळमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि भक्तांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पुस्तकांचे गाव तेथे झाल्यास आणखी एक आकर्षण पर्यटकांसाठी वाढणार आहे. तंटामुक्त, वाचन संस्कृती, आदर्शगाव, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, निसर्गसंपन्नता, शांतता याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यास वेरूळचा प्रस्ताव दिला होता.
राज्यात या ठिकाणी पुस्तकांचे गाव
लोकसहभाग, २५० चौ. फुटाची दहा दालने, जागेची सुरक्षितता, वाचकांसाठी सुविधा, संबंधित संस्थांची राज्य मराठी विकास संस्थेसोबत करार करण्याची तयारी आवश्यक असणार आहे. एका दालनासाठी पाच लाख रुपये शासन अनुदान देणार आहे. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन, भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांचे आयोजन निवड झालेल्या संस्थांना करावे लागणार आहे. औरंगाबाद (वेरूळ), नागपूर (नवेगाव बांध), सिंधुदुर्ग (पोंभुर्ले), पुणे (अंकलखोप) या ठिकाणी पुस्तकांचे गाव सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.