...तर मराठीही हिंदीची उपभाषा होईल; सुधीर रसाळ यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:55 PM2019-06-14T14:55:09+5:302019-06-14T15:01:03+5:30
मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांचे जपवणूक करणे मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
औरंगाबाद : भारतामध्ये कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा करण्याच्या पात्रतेची नाही. हिंदी भाषा बोलणारे अधिक आहेत, एवढा एकच मुद्दा आहे; पण तेवढ्यासाठी हिंदी राष्ट्रभाषा करून सर्वांवर लादावी हे लोकशाहीच्या विरोधात आहे. हिंदीचे मराठीवरचे आक्रमण असेच चालू राहिले, तर काही वर्षांनंतर मराठी भाषा स्वत:चे अस्तित्व गमावून बसेल आणि भोजपुरीप्रमाणे हिंदीची एक उपभाषा होऊन जाईल, अशा शब्दांत डॉ. सुधीर रसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘मराठी वाचवा’ अभियानाबाबत मत व्यक्त केले.
नुकत्याच मांडलेल्या शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीची करावी या प्रस्तावाला विरोध केला. मराठी संवर्धनाविषयी बोलताना ते म्हणाले की, हिंदी भाषा ही आर्य कुळातल्या मराठी, गुजराती यांसारख्या प्रादेशिक भाषांवर आक्रमण करत आहे. मराठी भाषा अलीकडच्या काळात हिंदीच्या संपर्कामुळे विकृत होत आहे. जेव्हा एकाच कुळातल्या दोन भाषा एकत्र येऊ लागतात, तेव्हा जर एका भाषेचे वर्चस्व स्वीकारले गेले तर आपोआपच दुसरी मूळ भाषा नष्ट होऊ लागते, हे सध्या मराठीच्या बाबतीत होऊ पाहत आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य या गोष्टींची जपवणूक करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
अमेरिकेत गेल्यावर प्रत्येक परभाषीय व्यक्तीला सर्वात आधी अमेरिकन इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही जेव्हा परराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवून मगच वर्गात प्रवेश दिला पाहिजे. महाराष्ट्रात तर शिक्षणाचे माध्यम हे मराठीच पाहिजे. शालेय पातळीवर मराठी हीच प्रमुख भाषा असली पाहिजे. याशिवाय महाराष्ट्रात जर स्वत:चे स्वतंत्र बोर्ड आहे, तर मग इतर बोर्डांना येथे प्रवेश का द्यावा? या बोर्डांना महाराष्ट्रात प्रवेश मिळणे, हे देखील मराठी मुलांवर अप्रत्यक्ष पद्धतीने अन्याय करणारेच आहे.