वेगे वेगे धावू...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:52 AM2017-11-06T00:52:16+5:302017-11-06T00:52:47+5:30
येथील फन रनर फाऊंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील फन रनर फाऊंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. राजकीय पदाधिका-यांसह राज्यभरातून आलेल्या २१०० स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. एकूणच सकाळच्या गुलाबी थंडीत मॅरेथॉन स्पर्धेने वातावरण भारावून गेले होते.
जालनेकरांना आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरट्याल, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सकाळी झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी माजी आ. अरविंद चव्हाण, भाजप उपाध्यक्ष भास्कर दानवे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांची उपस्थिती होती.
जालन्यात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धा पाहण्यासाठी जालनेकरांनी मंठा चौफुलीवर मोठी गर्दी केली होती. सकाळी साडेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात २१ किलोमीटर, दुसºया टप्प्यात १० कि.मी आणि तिसºया टप्प्यामध्ये पाच कि.मी गटातील स्पर्धक सहभागी झाले होते. २१ किलोमीटर स्पर्धकांसाठी शेवटचे अंतर सिंधी काळेगावपर्यंत ठेवण्यात आले होते. २१ आणि दहा कि.मी. गटात सहभागी स्पर्धकांच्या वेळीची अचूक नोंद घेण्यासाठी विशिष्ट इलेक्ट्रानिक चीपची सुविधा स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. स्पर्धकांना प्रोत्साहन वाढविण्यासाठी केली जाणारी कॉमेंट्री, संगीत व टाळ्यांमुळे वातावरणात उत्साह होता. स्पर्धकांना धावताना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने एका बाजूची वाहतूक पूर्णत: बंद केली होती. तसेच स्पर्धेच्या मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. राजीव जेथलिया, डॉ. राजन उढाण, डॉ. संजय अंबेकर, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. किसन खिलारी यांच्यासह शहरातील डॉक्टर्स आणि फन रनर फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
हे ठरले मॅरेथॉन विजेते
स्पर्धेच्या २१ किलोमीटर गटात पुरुषांमध्ये मुंबईच्या शैलेश निसार यांनी प्रथम, औरंगाबादच्या डॉ. अजित घुले यांनी द्वितीय तर जालन्याचे प्रशांत भाले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. महिलांमध्ये औरंगाबादच्या माधुरी निमजे, मुंबईच्या डॉ. मीनाक्षी कासाट आणि औरंगाबादच्या वर्षा देशमुख यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
दहा किलोमीटर गटात पुरुषांमध्ये औरंगाबादचे विजय शिंपी, भगवान कछवे व जालन्याचे विजय भाले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. महिलांमध्ये औरंगाबादच्या अनुराधा कछवे, जालन्यातील ज्योती चव्हाण आणि मुंबईच्या नीता चौधरी या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.