सवलत मिळण्याची आशा; मराठवाड्यात १९ लाख वीज ग्राहकांनी ७ महिन्यांपासून एकदाही भरले नाही बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 06:09 PM2020-11-19T18:09:35+5:302020-11-19T18:12:30+5:30
वाढीव वीज बिलाच्या तक्रारीमुळे आणि सवलत मिळण्याच्या आशेने वीज बिल भरण्याचे टाळण्यात आले.
औरंगाबाद : महावितरण औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ८ जिल्ह्यांतील तब्बल १९ लाख १२ हजार ८९२ लघुदाब वीज ग्राहकांनी एप्रिलपासून एकदाही वीजबिल भरलेले नाही. त्यांचे १३ हजार ५६५ कोटी रुपयांचे बिल थकल्याने महावितरणचा थकबाकीचा डोंगर वाढला आहे.
वाढीव वीज बिलाच्या तक्रारीमुळे आणि सवलत मिळण्याच्या आशेने वीज बिल भरण्याचे टाळण्यात आले. त्यामुळेही थकबाकी वाढत गेली आहे. महावितरण महानिर्मितीसह खाजगी वीजनिर्मिती कंपन्या, जलविद्युत व इतर ठिकाणाहून वीज खरेदी करून वीज ग्राहकांना वीजपुरवठा करत आहे. वीजनिर्मिती ठिकाणाहून महावितरणच्या उपकेंद्रापर्यंत महापारेषणकडून वीजपुरवठा केला जातो.
वीज खरेदी व वहनाचे महावितरणला पैसे चुकते करावे लागतात. मात्र, विकलेल्या विजेचे पैसे दरमहा न आल्यास वीज खरेदी, देखभाल दुरुस्ती, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन खर्च व सुरळीत वीजपुरवठा करणे अवघड होत आहे. यामुळे महावितरणला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या चालू बिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.