दुष्काळामुळे मराठवाड्यातील ६१ तालुक्यांत परिस्थिती गंभीर; दिवाळीच्या आनंददायी सणावर पूर्ण विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 08:13 PM2018-11-12T20:13:18+5:302018-11-12T20:15:23+5:30
सद्य:स्थिती पाहता डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण मराठवाडाच दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असेल.
औरंगाबाद : राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांच्या पाहणीअंती शासनाने मराठवाड्यातील गंभीर दुष्काळाबाबत आणखी तिसरी यादी जाहीर केली आहे.
सद्य:स्थिती पाहता डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण मराठवाडाचदुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असेल. शासनाच्या परिपत्रकानुसार पाच जिल्ह्यांतील २० तालुक्यांतील ६८ मंडळांतील १३६० गावे दुष्काळाच्या लपेट्यात आली आहेत. यंदाच्या दिवाळीवर पूर्णत: दुष्काळाचे सावट आल्याने या आनंदाच्या सणाला उधाण आल्याचे दिसून आले नाही.
दुष्काळी तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये गंभीर तसेच मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यामध्ये मराठवाड्यातील २७ तालुक्यांत गंभीर, तर १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी घोषित १५१ तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांतील २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यात मराठवाड्यातील २० तालुक्यांतील ६८ मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
दुष्काळ घोषित केल्याचे आदेश ३१ आॅक्टोबरपासून अमलात येतील. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना अमलात आणण्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत असून, त्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना अमलात आणाव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
मराठवाड्यात फक्त ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील उत्पादकता निम्म्यावर आली. खरिपाच्या उत्पन्नावरच दिवाळसण साजरा केला जातो; परंतु यंदा खरिपाचा हंमाग संपुष्टात आल्यामुळे ग्रामीण भागातील दिवाळसणाच्या आनंदावर विरजण पडले.
६८ मंडळांत या सवलती :
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्यात येईल. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. रोहयोंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता असेल. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर करण्यास मुभा असेल. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित करू नये.
मराठवाड्यातील भौगोलिक परिस्थिती अशी :
एकूण जिल्हे : ८
शेतकरी किती : ६२ लाख
खरीप व रबी पेरणी : ६० लाख हेक्टरच्या आसपास
तालुक्यांची संख्या : ७६
दुष्काळी तालुके : ६१
गावांची संख्या : ८५३३
मंडळांचा आकडा : ४६३
आजवर झालेला पाऊस : ६३ टक्के
खरीप हंगाम गेलेली गावे : २९५८