मराठवाड्यात सहा महिन्यांत ६२ जण लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:23 PM2019-07-01T19:23:22+5:302019-07-01T19:24:58+5:30
लाचखोरी कमी होत नसल्याचे चित्र, लुबाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
औरंगाबाद : भ्रष्टाचार हटावचा नारा नवा राहिलेला नाही, देशाचे पंतप्रधान यांनी देखील ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असा भाषणातून दमदार उल्लेख केला; परंतु इच्छा नसताना एकमेकांना कुरतडण्याचे काम सातत्याने बिनबोभाटपणे सुरूच असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यात आवघ्या सहा महिन्यांत ६२ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
लोकांच्या इच्छेविरुद्ध गळचेपी करून त्यांच्याकडून पैसा लुबाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होत आहे. शासकीय यंत्रणेत महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षण, बांधकाम विभाग, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका तसेच शासकीय कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर खातरजमा करीत जाळे टाकले जाते. अनेकदा हेतुपुरस्सर किंवा खोडसाळपणे कुणी प्रयत्न करते का, याची शहानिशा करण्यासाठी शासकीय व खाजगी पंचासमक्ष पडताळणी करूनच सापळा रचला जातो. फिर्यादी आणि लाचखोर यांच्या समन्वयानुसार एसीबी आपला सापळा लावते.
अनेकदा चोरपंक्चर असल्यास सापळे फेल ठरतात, तर सापळ्यात एक सहकारी अडकला तरी दुसरा सावधानतेची भूमिका घेण्याऐवजी बिनधास्त खाबूगिरी चालू ठेवतो; परंतु दक्ष नागरिकांच्या भूमिकेमुळे अशा खाबूगिरांना लाचलुचपत विभागाने जाळ्यात पकडले आहेत. कारवाईकडे अनेकदा दुर्लक्ष करीत पुन्हा सवयीप्रमाणे जाऊ तिथं खाऊ अशीच अवस्था पाहण्यास मिळते. कारवाईनंतर अनेक जण घरी गेले आणि अनेकांच्या शासनदरबारी फेऱ्या सुरू आहेत; परंतु एखाद्याला गंभीर सजा झाल्यास कदाचित खाबूगिरीची वृत्ती कमी होणार नाही. भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाच्या कक्षेत विविध यंत्रणा काम करीत असून, लवकर आणि झटपट कामासाठीची भूमिका, हव्यास टाळल्यास सामान्य व्यक्तींना नाहक होणारा त्रास टळू शकतो.
जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत मराठवाड्यात ६२ सापळे यशस्वी झाले आहेत. जालना जिल्ह्यात २०, औरंगाबाद १७, बीड १२, उस्मानाबाद १३ असे सहा महिन्यांतील चित्र आहे, तर जानेवारीत मराठवाडाभर या विभागाने ८, फेब्रुवारी १२, मार्च ९, एप्रिल ९, मे १३, जून ११ सापळे यशस्वी झाले आहेत.
नागरिकांनी पुढे यावे...
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद कार्यालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस अधीक्षक