मराठवाड्यातील ६४.४९ टक्के पदवीधर पोहोचले
By | Published: December 3, 2020 04:08 AM2020-12-03T04:08:10+5:302020-12-03T04:08:10+5:30
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ८ जिल्ह्यांतील ६४.४९ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निवडणूक निकालाची चुरस वाढविली ...
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ८ जिल्ह्यांतील ६४.४९ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निवडणूक निकालाची चुरस वाढविली आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. ३९ टक्के मतदान गेल्या निवडणुकीत झाले होते. यावेळी जास्त मतदान झाल्यामुळे मतमोजणी जास्त वेळ चालणार आहे. मागच्यावेळी मतमोजणीच्या ४ फेऱ्या झाल्या होत्या. यावेळी ५६ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था केल्यामुळे कमी वेळ लागेल, असा दावा यंत्रणा करीत आहे. ३ डिसेंबर रोजी या मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण, भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह ३५ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीविरुध्द महायुती असा प्रचार या निवडणुकीत केला गेला. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह काही अपक्षांनीदेखील जोरदार प्रचार करीत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत खेचून आणल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. तरुण मतदारांचा मोठा उत्साह, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला.
शेवटच्या तासात वाढले मतदान
३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ६४९ पदवीधर मतदारांनी मतदान केले आहे. ५१.९८ टक्के महिला पदवीधर आणि ६८.२९ टक्के पुरुष पदवीधर मतदारांनी मतदान केले. दुपारी ४ वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले होते. ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. या शेवटच्या तासात सुमारे १२ टक्के मतदान वाढले. काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू होते.