हिमॅटोलॉजी केंद्रासाठीही मराठवाड्याला वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:59 PM2018-09-17T15:59:13+5:302018-09-17T16:00:27+5:30

रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपूर, पुणे, मुंबई या तीन ठिकाणी हिमॅटोलॉजी केंद्र सुरू करण्यात येणार आहे

Marathwada is also excluded for Hematology centers | हिमॅटोलॉजी केंद्रासाठीही मराठवाड्याला वगळले

हिमॅटोलॉजी केंद्रासाठीही मराठवाड्याला वगळले

googlenewsNext

औरंगाबाद : रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपूर, पुणे, मुंबई या तीन ठिकाणी हिमॅटोलॉजी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी नागपुरात जाहीर करण्यात आले. मराठवाड्याला हिमॅटोलॉजी केंद्रासाठी वगळण्यात आले. मराठवाड्यात आरोग्याचे प्रश्न नाहीत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी केंद्र सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार झाल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी नागपुरात दिली. या तीन वैद्यकीय महाविद्यालयांत केंद्रासाठी लागणाºया पायाभूत सोयीसुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रात हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेलसाठी डे-केअर सेंटरची सोय असणार आहेत. तसेच शिक्षण, संशोधन, माहिती संकलन व क्लिनिकल ट्रायल हे या केंद्रांचा मुख्य उद्देश राहणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्णांच्या तपासणीची सुविधा आहे; परंतु हिमोफेलियाच्या उपचारासाठी सुविधा नाही, तर नुकतेच जिल्हा सामान्य रुग्णालयात डे केअर सेंटर सुरूकरण्यात आले. हिमोफेलिया, सिकलसेल आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांवर उपचार केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. 

प्रत्यक्षात अपूर्ण सुविधांमुळे केवळ हिमोफेलियाच्या रुग्णांवर उपचार शक्य होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे औरंगाबादेत अनेक आजारांवर अद्ययावत उपचार होत असताना रक्ताच्या विकारावर उपचार होत नसल्याचे वास्तव आहे. रुग्णांना पुणे, मुंबई किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे हिमॅटोलॉजी केंद्र मराठवाड्यातही व्हावे, अशी मागणी होत आहे.

केंद्र मंजूर करावे
हिमॅटोलॉजी केंद्रासाठी मराठवाड्याचा विसर पडला. मुंबईस्थित डॉ. सुनील बिचले हे मराठवाड्यात दर महिन्याला येऊन सेवा देतात. त्यांच्याही मते मराठवाड्यात असे केंद्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे तीन केंद्रांबरोबर मराठवाड्यातही हे केंद्र मंजूर करावे. मराठवाड्याशी शासन दुजाभाव करीत नाही, हे कृतीतून दाखवून द्यावे.
- डॉ. अशोक बेलखोडे, सदस्य व अध्यक्ष, आरोग्य समिती, मराठवाडा विकास मंडळ

Web Title: Marathwada is also excluded for Hematology centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.