मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे खरिपाचे ३५ % उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:23 PM2018-09-03T13:23:52+5:302018-09-03T13:35:00+5:30
मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता
औरंगाबाद : मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विभागाने एका अहवालानुसार विभागीय आयुक्तांकडे वर्तविली आहे. ३१ आॅगस्टपर्यंत विभागातील पाऊस तसेच पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेणारी माहिती कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिली आहे.
गेल्या वर्षी बोंडअळीमुळे खरिपाचे नुकसान झाले. यंदाही बोंडअळी आणि खोड किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे. विभागातील ७९९ मि. मी. पावसाच्या तुलनेत आजवर ४७२.५० मि. मी. इतका पाऊस झाला असून, पावसाळ्याच्या ९२ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडे गेले आहेत. हे अलीकडच्या तीन वर्षांतील सर्वाधिक खंड प्रमाण आहे. पावसाच्या खंडामुळे कापूस व मक्यासह इतर सर्व पिकांच्या उत्पादनाला ३० ते ३५ टक्के फटका बसणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. औरंगाबाद, बीड आणि काही प्रमाणात जालना जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सारखीच आहे.
गेल्या वर्षी कापसाचे पीक बोंडअळीने पोखरले. परिणामी यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी उसाचा पर्याय निवडला आहे. ज्यांनी यंदाही कापसाची लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पदरी बोंडअळीमुळे नुकसान येण्याची शक्यता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या. १५ लाख हेक्टरवर यंदाच्या हंगामात कापसाची प्रत्यक्ष पेरणी झाली. पावसाअभावी आणि किडीमुळे कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होणे शक्य आहे. कीड व बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
४ लाख ४६ हजार हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे तुरीचे पीक वाढले असले तरी उत्पादनावर परिणाम होणे शक्य आहे. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के घट होईल. औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी खरीप हंगामातील उत्पादनावर पावसाअभावी परिणाम होणे शक्य असल्याचे सांगितले.
खरिपात ९ हजार कोटींची गुंतवणूक
मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीक पेरणीच्या खर्चाच्या अंदाजानुसार खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.