मराठवाड्याला दमदार पावसाची प्रतीक्षा; अवघा ६.३७ टक्के पाऊस, पेरण्या खोळंबल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:08 PM2022-06-16T12:08:41+5:302022-06-16T12:09:15+5:30
मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६७९.५
औरंगाबाद / लातूर/ हिंगोली : मराठवाड्यात १५ जूनपर्यंत ६.३७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अद्याप दमदार पाऊस पडला नाही. मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे विभागात उशिरा पावसाला सुरुवात झाली असून, याचा परिणाम पेरणीवर झाला आहे.
बुधवारी लातूर आणि हिंगोलीत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. हिंगोली शहर व जिल्ह्यात मंगळवारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. लातुरात दिवसभर उकाडा जाणवला. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले व दुपारी ४ वाजेच्या सुमारास लातूर शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे बाजारात शेतकरी, व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंजगोलाई, दयानंद गेट, पाच नंबर चौक, रेणापूर नाका, राजीव गांधी चौक आदी भागातील हातगाडे व्यावसायिक, रयतू बाजारातील व्यापारी, शेतकऱ्यांनी पावसामुळे लवकरच दुकाने गुंडाळली. हरंगुळ बु, हरंगुळ खु., बसवंतपूर, खाडगाव, खोपेगाव आदी भागात जवळपास अर्धा तास रिमझिम पाऊस पडला.
१४ जून रोजी हिंगोली जिल्ह्याचे तापमान कमाल ३३, तर किमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत कडक ऊन पडले होते. दुपारी साडेतीन वाजता ढग जमायला सुरुवात झाली होती. त्यानंतर दुपारी चार ते साडेचार वाजेपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. जिल्ह्यातील कहाकर (बु.), केंद्रा (बु.), औंढा नागनाथ, रामेश्वरतांडा, आखाडा बाळापूर, कळमनुरी गोरेगाव आदी गावांमध्ये पावसाने दमदार अशी हजेरी लावली. मेघगर्जना होत असल्यामुळे दरम्यान काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला होता.
वार्षिक पर्जन्यमान
विभागाचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६७९.५ मि. मी. आहे. यात औरंगाबाद ५८१ मि.मी., जालना ६०३, बीड ५६६, लातूर ७०६, उस्मानाबाद ६०३, नांदेड ८१४, परभणी ७६१, तर हिंगोली जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७९५ मि.मी. इतकी आहे.
आजवर पडलेला पाऊस
औरंगाबादेत ८.७२ टक्के, जालना ६.५५ टक्के, बीड ८.११ टक्के, लातूर ४.५ टक्के, उस्मानाबाद ६.७५ टक्के, नांदेड ६.७ टक्के, परभणीत ६.१७ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यात ४.६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.