दुष्काळवाडा नव्हे मराठवाडा झाला ‘पाणीदार’; भूजल पातळीत १.७० मीटरने वाढ
By साहेबराव हिवराळे | Published: November 12, 2022 06:32 PM2022-11-12T18:32:58+5:302022-11-12T18:35:10+5:30
मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : सातत्याने दुष्काळाशी दोन हात करणारा मराठवाडा यंदा पाणीदार झाला असून, दमदार पर्जन्यवृष्टीमुळे विभागातील पाणीपातळीत सप्टेंबरमध्ये २.७१ मीटरने, तर पाच वर्षांच्या तुलनेत १.७० मीटरने वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत ८७५ निरीक्षण विहिरींच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आलेली आहे. यंदा पाणीटंचाई मराठवाड्याला भेडसावणार नसल्याचे मत भूजल विभागाने व्यक्त केले आहे.
पावसाचे पाणी वाहून जाण्याचे क्षेत्र अधिक असल्याने पाण्याचे सिंचन होत नाही, त्यामुळे उतरावर शेती असलेल्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे. यंदा सातत्याने पावसाचे हजेरी लावल्याने मराठवाड्यात भूजल पातळी २.७१ ते १.७० मीटरने वाढली आहे. दरवर्षीच ‘दुष्काळवाडा’ म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा यंदा पाणीदार झाला आहे. पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे, पिके वाहून गेल्याचे चित्र ताजे आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे टँकरच्या फेऱ्याला ब्रेक लागणार आहे.
मराठवाड्यातील भूजल पातळी
जिल्हा.......निरीक्षण विहिरी....पाणी पातळीतील वाढ
औरंगाबाद.........१४१...................१.६०
जालना.............११०...................१.८०
परभणी.............८६....................३.२२
हिंगोली.............५५....................०.७५
नांदेड...............१३४...................२.१४
लातूर...............१०९...................१.३५
उस्मानाबाद........११४...................१.६९
बीड..................१२६...................१.६२
एकूण................८७५....................१.७०
(पाणी पातळी मीटरमध्ये)
सर्व तालुक्यांत भूजल पातळीत वाढ
८७५ निरीक्षण विहिरीतील पाणी पातळी मोजली असता मराठवाड्यात यंदा पाच वर्षांच्या तुलनेत १.७० मीटरने पाणी पातळी वाढली आहे. विभागातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुके असून, त्यातील प्रत्येक तालुक्यातील पाणी पातळी पाच वर्षांच्या तुलनेत वाढलेली असल्याने गावातील व शेतातील पाणीप्रश्न यंदा भेडसावणार नाही, असे मानले जाते.
सिंचन वाढविण्याची गरज
सरासरीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर निरीक्षण विहिरींची तपासणी केली असता त्यात मराठवाड्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. उतारावरील पाणी वाहून न जाता त्याचे सिंचन वाढविण्याची गरज आहे.
- भीमराव मेश्राम, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, औरंगाबाद