अमित शाह यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य; पोलिसांनी दिले महत्वाचे कारण...

By सुमित डोळे | Published: February 29, 2024 11:35 AM2024-02-29T11:35:41+5:302024-02-29T11:37:12+5:30

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दुसरी जागा शोधण्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सूचना

Marathwada Cultural Ground unsuitable for Amit Shah's meeting; Police refused permission because of 'this' | अमित शाह यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य; पोलिसांनी दिले महत्वाचे कारण...

अमित शाह यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य; पोलिसांनी दिले महत्वाचे कारण...

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ५ मार्च रोजी शहरातील सभा निश्चित झाली आहे. भाजपचा खडकेश्वरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा घेण्याचा विचार आहे. मात्र, शाह व अन्य व्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान योग्य नसल्याचे पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.

अमित शाह यांचा १५ फेब्रुवारी रोजी दौरा नियोजित होता. मात्र, तो ऐनवेळी रद्द झाला. आता पुन्हा दौरा ठरल्यामुळे भाजपसह गृह विभाग, पोलिस प्रशासनाने सुरक्षा, कायदा, सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.

राजकीय सभांची मोठी पार्श्वभूमी असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच सभा घेण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा हट्ट आहे. सभेच्या तयारीचा आढावा व जागा पाहणीसाठी राज्यातील एक ज्येष्ठ नेतेदेखील १ किंवा २ मार्च रोजी येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नुकतीच मैदानाची पाहणी केली. त्यात मात्र बंदोबस्त, सुरक्षेच्या अनुषंगाने मैदान योग्य नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

का असुरक्षित ?
- शाह हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे अतिमहत्त्वाचे सुरक्षित व्यक्ती आहेत. त्यांना झेड प्लस (विशेष) दर्जाची सुरक्षा आहे. सीआरपीएफवर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते.
- यात ५५ अद्ययावत शस्त्रधारी जवानांचा समावेश असतो. ज्यात १० पेक्षा अधिक एनएसजी कमांडो असतात. पंतप्रधानांच्या बंदोबस्तातील जवानांकडे असलेली ब्रीफकेस बॅलिस्टिक शील्ड शाह यांच्या बंदोबस्तात असते. अन्य तपास व गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी असतात.
- त्यांच्या ताफ्यात वाहनांची संख्या अधिक असेल. शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४ व्हीआयपी उपस्थित असतील. जवळपास १४ ते १५ आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. मैदानाचा परिसर हा रहिवासी व अत्यंत अरुंद रस्त्यांचा आहे. त्यामुळे सुरक्षेसाठीची वाहनांची संख्या, जवानांची संख्या, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त करणे परिसरात अवघड जाईल.
- शिवाय पार्किंगसाठी अपुरी जागा, मैदानामधील भिंतीदेखील पडण्याच्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्य मैदानाचा पर्याय स्वीकारण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.

 

Web Title: Marathwada Cultural Ground unsuitable for Amit Shah's meeting; Police refused permission because of 'this'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.