मराठवाड्यातील दुष्काळ आणि राजकारणातील ‘राज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:02 PM2018-10-29T14:02:35+5:302018-10-29T14:04:07+5:30
विश्लेषण : पवार-राज यांच्या जवळिकीतून काय घडते, हेही बघणे औत्सुक्याचेच ठरणार आहे. याचा नेमका फायदा कुणाला होईल, याबद्दलही राजकीय जाणकारांना कुतूहल आहेच. युत्या होतात, आघाड्या होतात, आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा असे राजकारणात सुरूच असते; पण ‘मनकी बात’काही वेगळीच असते. त्यातले ‘राज’ कळतच नसते.
- स.सो. खंडाळकर
मराठवाड्यातील दुष्काळावर उपाययोजना लांबच राहिल्या; पण त्यावरचे राजकारण मात्र झपाट्याने तापत चाललेले दिसतेय आणि मग शरद पवार काही बोलले म्हटल्यावर त्यातली रंगत आणखी वाढतच जात असते. शरद पवारच काल औरंगाबादेत वारंवार राज्य शासनाला बजावत होते, ‘ही वेळ शब्दांचा खेळ खेळण्याची नाही. बालिशपणा करण्याची नाही. शहाणपणाने वागण्याची व गांभीर्याने निर्णय घेण्याची आहे.’ या जाणत्या राजाचे हे अनुभवाचे बोल...! ‘सर्वज्ञ असल्यासारखे न वागता जरा जाणकारांचा सल्लाही घेत जावा’अशा शब्दांत दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे कान पवार यांनी टोचले आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. ती काय येईल, याबद्दल औत्सुक्य असू शकते.
राजकारण बाजूला ठेवून मराठवाड्याच्या दुष्काळाची चर्चा झाली पाहिजे. त्यातले गांभीर्य हरवता कामा नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे. अन्यथा दुष्काळग्रस्त मराठवाड्याशी मराठवाड्याच्या बाहेरची मंडळी प्रतारणा करीत आहेत, असा त्याचा अर्थ होईल. राज्यकर्ते कुणीही असोत, जरा पवारसाहेबांचे त्यांनी ऐकले पाहिजे. हक्काने काही सांगण्याची त्यांची पात्रता आहेच.
तरुणालाही लाजवणारी सक्रियता
चिखलीतला कार्यक्रम आटोपून शरद पवार औरंगाबादेत आले. पत्रकारांच्या वार्तालापासाठी दिलेल्या वेळेच्या आतच पंचतारांकित हॉटेलच्या दालनात दाखल झाले. दुष्काळ, शेती, पाणी या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर ते मनापासून आणि भरपूर बोलले. पवार यांची आजची सक्रियता तरुणाईलाही लाजवणारी अशीच आहे. दुर्धर आजारांवर त्यांनी खरोखरच विजय मिळवला आहे. एखाद्या ठिकाणी शरद पवार मुक्कामाला आले आणि तिथे काही घडामोड घडली नाही, असे कधी झाले नाही. कालही तसेच घडले. विदर्भाचाच दौरा आटोपून दुपारी २ वाजेपासून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले. पुण्यातल्या जाहीर मुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातले सख्य वाढलेले आहे, हा अनुभव नवा नाही. आता या दोघांना औरंगाबादेत काय नुसत्याच गप्पा थोडीच मारायच्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेले आहेतच; पण शरद पवार औरंगाबादच्या पत्रपरिषदेत बरेच रमले. एकेका प्रश्नावर त्यांनी दिलेली उत्तरे अभ्यासपूर्ण तर होतीच; पण ती भावी महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त होती.
हे सहज घडत नाही
आधी लवकर उठण्याची सवय लावून घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरे यांना एकेकाळी दिला होता. शरद पवार यांच्यावर अत्यंत कडवी आणि जहरी टीका करण्याची एकही संधी न सोडणारे राज ठाकरे हे पवार यांच्या एवढे निकट जाणे हेही एक गूढच. हे गूढ आता आणखीन गडद होत चाललेय. यातली बेरीज-वजाबाकी आगामी निवडणुकांमध्येच दिसेल कदाचित. शरद पवार यांची पत्रपरिषद लांबल्यामुळे औरंगाबादच्या पंचतारांकित हॉटेलमधील राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही; पण दोन्ही नेते विमानात शेजारी शेजारी बसून चर्चा करीत आहेत, हे दृश्य साऱ्या महाराष्ट्राने माध्यमाच्या माध्यमातून पाहिले. हे सहज घडत नाही. दुष्काळ आणि राजकारणातील ‘राज’ते हेच.
औरंगाबादसाठी राष्ट्रवादी आग्रही
१९९९ पासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस हरत आली. चंद्रकांत खैरे यांची दरवेळीच लॉटरी लागत गेली. आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवीय. उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांचे नावही शरद पवार यांच्या तोंडून निघालेले आहे. महाराराष्ट्रातल्या सुमारे ४२ जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झालेले आहे. बोटावर मोजता येण्यासारख्या जागांवर निर्णय व्हायचाय. लवकरच तोही होऊन जाईल. नाहीतर राहुल गांधी आणि मी बसून निर्णय घेऊ, असे सुतोवाच पवार यांनी केलेय. औरंगाबादच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही दिसते. काय होते ते काळच ठरवेल.