श्रावणातही मराठवाडा कोरडाच;जायकवाडी वगळता बहुतांश धरणे मृतसाठ्यात, काही कोरडीठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 07:39 PM2019-08-21T19:39:30+5:302019-08-21T19:41:38+5:30
१०० मि.मी. पावसाची तूट
औरंगाबाद : श्रावण महिना शेवटच्या चरणात आहे, तरीही मराठवाडा अजून कोरडाच आहे. विभागात ९ आॅगस्टपासून पावसाने दडी मारली आहे. १०० मि.मी. पावसाची सध्या आवश्यकता असून, आजवर फक्त ३०२ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण ७७९ मि.मी. सरासरीच्या तुलनेत ४७६.८७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. हवामान खात्याच्या गणनेनुसार सध्या पावसाळ्याचे ४१ दिवस शिल्लक आहेत.
विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सात प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. जायकवाडीत ९१.६८ टक्के इतका जलसाठा सध्या शिल्लक आहे. त्यानंतर मनारमध्ये २४.३० टक्के, विष्णुपुरीमध्ये २१.८६ टक्के, तर पेनगंगामध्ये १४.८५ टक्के पाणीसाठा आहे. सीना कोळेगाव, मांजरा, माजलगाव, सिद्धेश्वर, येलदरी, निम्न दुधना हे प्रकल्प मृतसाठ्यातच आहेत. विभागात ९२ टक्क्यांच्या आसपास खरीप हंगामात पेरणी झाली आहे. आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे पेरणी क्षेत्र ८ टक्क्यांनी वाढले. गेल्यावर्षी खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी ५0 टक्क्यांवर हंगामाचे उत्पादन घटले होते. दरम्यान, पुढील आठ दिवस विभागातील हवामान कोरडेच राहील, त्याचा परिणाम ढगाळ वातावरणावर होऊ शकतो, असे हवामानाचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
२२ लाख नागरिकांना टँकरचे पाणी
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या विभागातील ९०६ गावे १५५ वाड्यांत राहणाऱ्या सुमारे २२ लाख ७१ हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. उर्वरित पावसाळ्यात पाऊस झाला नाही, तर विभागातील काही जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
आजवर मराठवाड्यातील जिल्ह्यांत झालेला पाऊस
जिल्हा वार्षिक
टक्केवारी
औरंगाबाद ४७.५३
जालना ३९.४४
परभणी ३५.७७
हिंगोली ४२.९९
नांदेड ४९.५८
बीड २४.३०
लातूर ३४.७६
उस्मानाबाद ३२.०६
एकूण ३८.७८ टक्के