मराठवाड्याला मिळणार ३७०० कोटी; बीड जिल्ह्याला सर्वाधिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 06:34 PM2021-10-15T18:34:51+5:302021-10-15T18:37:51+5:30
crop damage in Marathwada : मराठवाड्यात ७ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबरदरम्यान गुलाब वादळाच्या परिणामांसह झालेल्या अतिवृष्टीमुळे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र वाढले आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात ४७ लाख शेतकऱ्यांचे ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे ( rain hits Marathwada ) नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी २५८५ कोटी रुपयांची गरज एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे असतानाच बुधवारी राज्य शासनाने जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून विभागाला सुमारे ३७०० कोटी रुपये मिळण्याची ( Marathwada to get Rs 3,700 crores relief package ) शक्यता आहे. ९७५ कोटी रुपये एनडीआरएफच्या निकषांच्या तुलनेत जास्तीचे मिळणार असून, बीड जिल्ह्याला सर्वाधिक ६३४ कोटींची मदत मिळणार आहे.
मराठवाड्यात ७ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबरदरम्यान गुलाब वादळाच्या परिणामांसह झालेल्या अतिवृष्टीमुळे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र वाढले आहे. राज्यशासनाने १० हजार कोटींचे पॅकेज तातडीची मदत म्हणून जाहीर केले असले तरी यात मराठवाड्यातील नुकसान पाहता ३७०० हजार कोटी त्यातून मिळणे शक्य आहे. जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार तर फळपिकांसाठी २५ हजार हेक्टरी मदत राज्यशासन देणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ५५५ कोटी रुपये, जालना जिल्ह्यात जिरायती क्षेत्रासाठी ४७७ कोटी, परभणीत ३३८ कोटी, हिंगोलीत २९४ कोटी, नांदेड ५५१ कोटी, लातूर ४३४ कोटी, उस्मानाबाद ३०५ कोटींची मदत मिळणार आहे. यात विभागातील १०२ कोटी बागायत आणि १२५ कोटी फळबागांच्या नुकसानीसाठी असणार आहे.
क्षेत्रनिहाय नुकसान असे
जिरायती क्षेत्र : ३५ लाख ३४ हजार हेक्टरसाठी अंदाजे ३५३० कोटी
बागायत क्षेत्र : ६८ हजार ३९१ हेक्टरसाठी सुमारे १०२ कोटी
फळपिकांचे क्षेत्र : ५० हजार १०९ हेक्टर सुमारे १२५ कोटी
एकूण क्षेत्र : ३६ लाख ५२ हजार हेक्टरसाठी ३७०० कोटी