मराठवाड्याला सहा मंत्रिपदे; संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील, मेघना बोर्डीकर पहिल्यांदाच मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:38 IST2024-12-16T18:37:53+5:302024-12-16T18:38:37+5:30
मराठावाड्याला ५ कॅबिनेट एक १ राज्यमंत्रिपद; अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय बनसोडे यांना डच्चू

मराठवाड्याला सहा मंत्रिपदे; संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील, मेघना बोर्डीकर पहिल्यांदाच मंत्री
छत्रपती संभाजीनगर : राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या विस्तारात ३९ मंत्र्यांमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला सहा मंत्रिपदे आली असून, यामध्ये तब्बल पाच कॅबिनेट मंत्रिपदे आणि एक राज्यमंत्रिपद मिळाले आहे. वादग्रस्त ठरलेल्या अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय बनसोडे यांचा पत्ता कट झाला आहे; तर संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील आणि मेघना बोर्डीकर (राज्यमंत्री) हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. याशिवाय अतुल सावे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या यापूर्वी मंत्री म्हणून काम केलेल्या तिघांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अतुल सावे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार (तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्हा), तानाजी सावंत (धाराशिव जिल्हा), धनंजय मुंडे (बीड जिल्हा) आणि संजय बनसोडे (लातूर जिल्हा) अशी पाच कॅबिनेट मंत्रिपदे होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक राज्यमंत्रिपद वाढले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांना मंत्रिपदे मिळाली आहेत; तर नांदेड जिल्ह्यात महायुतीचे नऊ आमदार निवडून येऊनही एकही मंत्रिपद मिळाले नाही. जालना, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही यंदा मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. मंत्रिपदापैकी धनंजय मुंडे आणि अतुल सावे यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे; तर पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे.
जिल्हानिहाय मंत्रिपदे
छत्रपती संभाजीनगर : २
बीड : २
लातूर : १
परभणी : १
पक्षनिहाय मंत्री
भाजप : ३
शिंदेसेना : १
राष्ट्रवादी (अप) : २