पदवीधर निवडणूक : सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर आहेत कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:02 PM2020-11-14T12:02:38+5:302020-11-14T12:06:10+5:30

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या उत्पन्नाचा स्रोत उद्योग, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. 

Marathwada Graduate Elections: Satish Chavan and Shirish Boralkar are billionaires | पदवीधर निवडणूक : सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर आहेत कोट्यधीश

पदवीधर निवडणूक : सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर आहेत कोट्यधीश

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही प्रमुख उमेदवारांवर दोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक कर्ज

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी थेट लढत अपेक्षित असणाऱ्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी काल १२ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल केले. त्या अर्जांसोबत त्यांनी शपथपत्राद्वारे मालमत्तेचे विवरण दिले आहे. निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या उत्पन्नाचा स्रोत उद्योग, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यावर अडीच कोटींच्या आसपास कर्ज असल्याचे त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. एमबीएपर्यंत शिक्षण झालेल्या बोराळकर यांच्याकडे स्थावर मालमत्ता पावणे सहा कोटींच्या आसपास आहे, तर पत्नी सुषमा बोराळकर यांच्या नावे साडेआठ कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. जंगम मालमत्तेचा तपशील देताना त्यांनी स्वत:च्या नावे १ कोटी ३२ लाख रुपयांची, तर पत्नीच्या नावे २० लाख रुपयांची मालमत्ता दाखविली आहे. शेती, घर, दागिने, वाहनांचा तपशील त्यांनी शपथपत्रात दिला असून कुठलाही गुन्हा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्नीच्या नावे तीसगाव येथे बाजारभावानुसार ८ कोटींची जमीन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिगरशेतीची ७ कोटींच्या आसपास मालमत्ता उमेदवार बोराळकर यांच्या नावे आहे. 

चव्हाणांकडील मालमत्ता
अभियांत्रीची पदवी घेतलेले राष्ट्रवादीचे उमेदवार चव्हाण आणि त्यांच्या पत्नी आशा चव्हाण यांच्या नावावर असलेल्या स्थिर, स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य सर्व मिळून १४ कोटी ४० लाखांच्या आसपास दाखविण्यात आले आहे.  पाच वर्षांतील करमूल्य उत्पादनाचा लेखाजोखा त्यांनी दिला आहे. चव्हाण दाम्पत्याकडे दीड कोटींच्या आसपास दागिने आहेत. १२ संस्थांमध्ये चव्हाण यांचे समभाग आहेत. २ कोटी ६४ लाखांच्या आसपास कर्ज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वाहन, शेती, विमा, गुंतवणूक शेअर्स, दागिने, घर आदी मालमत्तेचा त्यांनी दिला आहे.

Web Title: Marathwada Graduate Elections: Satish Chavan and Shirish Boralkar are billionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.