'मराठवाडा कोकणासारखा झालाय, आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:53 PM2021-09-07T13:53:20+5:302021-09-07T13:56:10+5:30
मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो
औरगाबाद - मराठवाडा म्हटलं की दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, वाळलेली रानं आणि पाण्याची, पावसाची वाट बघणारा माणूस हे चित्र डोळ्यासमोर उभा राहतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातही सौंदर्य फुललंय. बालाघाटच्या डोंगररांगात निसर्ग अवरतरलाय. नदी, नाले, धरणं तुंबड वाहत आहेत. त्यामुळेच, मराठवाड्यातील एका छायाचित्रकाराने महाराष्ट्र टुरिझम विभागाला प्रश्न केला आहे.
आमच्या मराठवाड्यावर अन्याय नको, हे राजकारणातील दिग्गज नेत्यांचं वाक्य महाराष्ट्राला परिचित आहे. निधी देण्याच्या बाबतीत, योजना मंजूरीच्या बाबतीत किंवा शेतकरी प्रश्नांच्या बाबतीत नेहमीच मराठवाड्यावर अन्याय होतो, असा सूर निघतो. आता, मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो, किंबहूना केलेच जात नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी, वारंवार ते मराठवाड्यातील निसर्ग सौंदर्याचे, ऐतिहासिक वास्तूंचे फोटो शेअर करुन महाराष्ट्र टुरिझम विभाग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना टॅग करत असतात. आजही त्यांनी फेसबुक पोस्ट करत, पावसामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला मराठवाडा दाखवा, अशी हाक या विभागाला घातली आहे.
मराठवाड्यात अगदी कोकणासारखं वातावरण झालयं... सतत पाऊस, नद्या वाहत आहेत, ओसंडुन वाहणारे धबधबे, डोंगरद-या हिरव्यागार... आता तरी महाराष्ट्र टुरिझमच्या FB पेजने मराठवाड्यातले फोटो टाकायला काय हरकतय?, असा प्रश्न सचिन यांनी विचारला आहे. आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका... असेही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादचं नाव घेतलं जात. येथील अजंठा-वेरुळ लेणी, बीवी का मगबरा, दौलताबाद किल्ला आणि निजामशहा, औरंगजेब बादशहा यांच्या वास्तू संग्रहालयाचे पर्यटन करण्यासाठी विदेशातून पर्यटक येत असतात. एकीकडे पर्यटनांचा ऐतिहासिक वारसा लाभला असताना, दुसरीकडे मराठवाडा म्हणजे दुष्काळी पट्टा, पावसाची वाट बघणारा शेतकरी असंच चित्र निर्माण झालय. मात्र, या मराठवाड्यातही निसर्ग सौंदर्य आहे, ते पाहिल्यास दिसेल. तसेच, मराठवाड्याचं हे सुंदर रुप महाराष्ट्र टुरिझम विभागाने दाखवल्यास निश्चितच मराठवाड्यात आणखी पर्यटन वाढेल, अशीच भावना सचिन यांनी व्यक्त केली आहे.
पावसामुळे रामेश्वर धबधबा ठरलाय आकर्षण
बीड जिल्ह्यातील कपिलधार असेल, सौताड्याचा धबधबा असेल, कंकालेश्वर मंदिर असेल, बालाघाटच्या डोंगररांगा असतील, औरंगाबाद असेल, औंढा-नागनाथाचं मंदिर असेल, नुकतेच सिने अभिनेते सयाजी शिंदेनी उभारलेली देवराई वनराई असेल, यामुळे मराठवाड्याचंही निसर्ग सौंदर्य बहरंल आहे. पावसामुळे सौताड्यातील रामेश्वर धबधबाही ओसंडून वाहत आहे. तर, कपिलधारलाही सुंदर निसर्गचित्र उभा राहिलंय.