मराठवाड्याला सर्वकाही भांडून मिळवावे लागते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:04 AM2021-09-26T04:04:46+5:302021-09-26T04:04:46+5:30
--- औरंगाबाद : संतांची भूमी असली तरी मराठवाड्याला सर्वकाही भांडून मिळवावे लागते. विकासासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन ...
---
औरंगाबाद : संतांची भूमी असली तरी मराठवाड्याला सर्वकाही भांडून मिळवावे लागते. विकासासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन काम करतात. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मराठवाड्याला झुकते माप मिळून अधिकचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
सावंगी वळण रस्ता ते केंब्रीजपर्यंत रस्त्याच्या १३ कोटींच्या निधीतून विशेष दुरुस्ती, भालगाव - शेंद्रा रस्ता विशेष दुरुस्तीसाठी पाच कोटींच्या कामाचे भूमिपूजन, कुंभेफळ येथे जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा शनिवारी झाला. यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, माजी आ. कल्याण काळे, नामदेव पवार, सुभाष झांबड, सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे, हिशाम उस्मानी, इब्राहीम पठाण, जगन्नाथ काळे, रामराव शेळके, ह.भ.प. तावरे नाना, सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंच मनीषा शेळके, मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, सुधीर मुळे, आदींची उपस्थिती होती.
मंत्री चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील १२३९ कोटींची रस्त्याची कामे अर्थसंकल्पात मंजूर आहेत. त्यातील २०० कोटींचा निधी सुरुवातीला दिला असून, २३७ कोटींच्या दुरुस्तीची कामे मंजूर केली. इमारतींच्या कामांना ३६५ कोटींची कामे मंजूर करून ८२ कोटी दिले. २०० पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील. औरंगाबाद-पुणे-मुंबई जोडण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. समृद्धी महामार्गासोबत नांदेड-औरंगाबाद-मुंबई बुलेट ट्रेनने जोडण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही लक्ष घालायला सांगणार आहे. लाडसावंगी-करमाड १५ किलोमीटर रस्ता सीआरएफ मधून घेण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत. केंब्रीज शाळेच्या चौकात, शेंद्रा येथे भर पावसात कार्यकर्त्यांनी मंत्री चव्हाण यांच्या क्रेनद्वारे मोठ्या हारांनी स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी केली.
---
मातोश्री पाणंद रस्त्याची योजना लवकरच
अतिवृष्टीत खचलेल्या विहिरी राेजगार हमी योजनेतून पुन्हा बांधण्यासाठी मदत करू तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येईल. त्या योजनेमुळे शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता बनवता येईल. प्रत्येक शेतात जायला पक्का रस्ता आपल्या भागात देऊ, असे रोहयो मंत्री संदीपान भुमरे म्हणाले.
---