मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:21 PM2020-10-12T12:21:04+5:302020-10-12T12:24:09+5:30

Marathwada hits by Return rains नद्या, नाल्यांना पूर, पिकांचे अतोनात नुकसान

Marathwada hits by Return rains ! | मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण !

मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण !

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यात अनेक धरणांतून विसर्ग वीज पडून ३ ठार,तर दोन जण जखमी झाले आहेत. 

औरंगाबाद : यावर्षी अतिवृष्टीने हैराण केलेल्या वरुणराजाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. अनेक धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग केला जात आहे. परतीच्या जोरदार पावसाने रविवारी मराठवाड्यात  तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. 

बीड जिल्ह्यातील सर्वच भागांत रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आले. त्यामुळे विविध ठिकाणी काही गावांचा संपर्क पूर ओसरेपर्यंत तुटला होता. केज तालुक्यात वीज पडल्याने एक शेतकरी ठार तर दुसरा जखमी झाला. बीड शहर, गेवराई, धारूर, वडवणी, शिरूर कासार, आष्टी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. माजलगाव धरणाचे तीन  दरवाजे रविवारी पहाटे उघडण्यात आले.जालना शहर व परिसरात रविवारी चार वाजेनंतर धुवाधार पाऊस झाला. परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले. नांदेड शहरासह कंधार, लोहा, नायगाव, मुदखेड, अर्धापूर या भागात रविवारी दुपारी पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन पिकाला पावसाचा अधिक फटका बसला आहे. तसेच हजारो हेक्टर क्षेत्रावरील उसाचे पीकही आडवे झाले. लातूर शहरासह जिल्ह्यात औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट तालुक्यात दोन दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे.      

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी रात्रभर पाऊस सुरू होता. रविवारीही दिवसभर पावसाने हजेरी लावली. हिंगोली व सेनगाव तालुक्यांतील सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. औंढा, वसमत, कळमनुरी तालुक्यांतही रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जमिनी जलमय झाल्या होत्या. सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात व शहरात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.

वीज पडून तिघांचा मृत्यू
मराठवाड्यात रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तसेच दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. विभागीय महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी अंतर्गत येणाऱ्या आनंदगाव येथे सायंकाळी ५.३० वा. वीज पडून सूर्यकांता गोरख गायके, मथुरा गणेश काळे जखमी झाल्या. जालना येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीडच्या केज तालुक्यातील हादगाव येथील झुंबरलाल शिवाजी केशव भांगे  यांच्यावर शेतातून घरी परतत असताना वीज पडली, त्यात ते दगावले. नांदेडच्या कंधार तालुक्यातील औराळ येथील बालाजी दशरथ गवाले हे शेतात काम करीत असताना त्यांच्यावर वीज पडून ते दगावले. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आलियाबादवाडी येथील सुशील बबन गायकवाड या वीज पडून मृत पावल्या.

पाणीच पाणी चोहीकडे
परभणी जिल्ह्यात शेतजमिनीत पाणी साचून कापणी करून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्याचप्रमाणे येलदरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून  ४ हजार २१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे. इकडे माजलगाव प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि होणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढली आहे.

Web Title: Marathwada hits by Return rains !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.