मराठवाडा येतोय टंचाईच्या विळख्यात, १०० मि.मी.पावसाची तूट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 01:30 PM2023-08-26T13:30:36+5:302023-08-26T13:31:58+5:30
लहान-मोठ्या सर्व ८७७ प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा सध्या आहे. ९८ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. ५७ गावांमध्ये ८४ टँकर्सने
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि नाशिक विभाग टंचाईच्या विळख्यात येण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत अलनिनोच्या प्रभावामुळे १०० कोटींचा टंचाई आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. मात्र, आता त्यात ५० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. १५० कोटी रुपयांचा संभाव्य आराखडा असेल.
मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विभागाच्या जलसाठ्यांसह चारा व इतर उपलब्धततेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यानंतर बुधवारी विभागीय आयुक्तांनी ऑनलाईन जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्याची परिस्थिती जाणून घेतली. विभागात पर्जन्यमानाची स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर होणारे परिणाम तपासावेत. त्यासाठी मंडळनिहाय तपासण्या कराव्यात, चाऱ्याच्या उपलब्धतेचे नियोजन करून ठेवावे. जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसी देण्याच्या सूचना बुधवारी विभागीय आयुक्तांनी केल्या
५१ दिवस कोरडे
२३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात ५४ टक्के पाऊस झाला आहे. ४६३ मि.मी. म्हणजे ७५ टक्के पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. १०० मि.मी.पावसाची तूट सध्या विभागात आहे. ४६८ पैकी १६९ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. ८४ पैकी सरासरी ५१ दिवस कोरडे गेले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिला खंड सरासरी १५ दिवसांचा, दुसरा खंड १८ दिवसांचा, तिसरा १६ तर चौथा खंड ९ दिवसांचा राहिला आहे. ३६ मंडळांत २५ टक्के, २०६ मंडळांत ५० टक्के, १४२ मंडळांत ७५ तर फक्त ८४ मंडळांत १०० टक्के पाऊस आजवर झाला आहे. लहान-मोठ्या सर्व ८७७ प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा सध्या आहे. ९८ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. ५७ गावांमध्ये ८४ टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.
कमी पाऊस झाल्याने चिंता....
मराठवाडा विभागात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झाले आहे. आतापर्यंतच्या पावसाळ्यात ५१ दिवस कोरडे राहिलेले आहेत. पावसाने अधिक ओढ दिल्यास पर्यायी उपाययोजनांसाठी नियोजन, पीक नुकसानीचे पंचनामे, लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कामे करावीत.
-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त