मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक कागदावरच; वर्ष झाले, ना पैशांची तरतूद ना प्रशासकीय मान्यता

By विकास राऊत | Published: September 12, 2024 07:59 PM2024-09-12T19:59:50+5:302024-09-12T20:01:16+5:30

आता १७ सप्टेंबर मुक्तिसंग्राम दिन पाच दिवसांवर आला असून, स्मारकाच्या कामासाठी काहीही हालचाली नाहीत.

Marathwada Liberation War memorial on paper itself; It has been a year, neither provision of money nor administrative approval | मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक कागदावरच; वर्ष झाले, ना पैशांची तरतूद ना प्रशासकीय मान्यता

मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक कागदावरच; वर्ष झाले, ना पैशांची तरतूद ना प्रशासकीय मान्यता

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ कोटी रुपयांतून लेबर कॉलनी येथे स्मारक उभारण्याची शासनाने केलेली घोषणा कागदावरच आहे. शासनाने ना पैशांची तरतूद केली, ना प्रशासकीय मान्यता दिली. दोन वर्षांत स्मारक बांधून पूर्ण होईल, असे गेल्या वर्षी शासनाने जाहीर केले होते. त्यातील एक वर्ष संपले आहे. आता १७ सप्टेंबर मुक्तिसंग्राम दिन पाच दिवसांवर आला असून, स्मारकाच्या कामासाठी काहीही हालचाली नाहीत.

स्मारकामध्ये संत दर्शन गॅलरी, आठही जिल्ह्यांतील प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे आठ स्तंभ, जिल्ह्याची ओळख दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचे प्रतिबिंब असतील. मुक्तिसंग्रामात ज्या हुतात्म्याने बलिदान दिले त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा असतील. आर्ट गॅलरी, अजिंठा आणि वेरूळ लेण्यातील चित्रे साकारली जातील. ग्रंथालयामध्ये मराठवाड्याचा इतिहास दर्शविणाऱ्या माहितीपटाचे सादरीकरणही करण्याचा समावेश आराखड्यात आहे.

१२५ कोटींचा आराखडा
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. अंदाजे १२५ कोटी रुपये खर्चून २०० फूट उंचीचे हे स्मृती स्मारक असेल. हे स्मारक बांधण्यासाठी किमान चार वेळा मुंबईत बैठका झाल्या.

पुन्हा द्या सुधारित प्रस्ताव
स्मारकाचा सुधारित प्रस्ताव प्रशासनाने द्यावा, असे आदेश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला दिले होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे. ही निर्मिती परिपूर्ण व्हावी यासाठी सुधारणा व नवीन बाबींचा समावेश आराखड्यात करून सुधारित प्रस्ताव शासनास तत्काळ सादर करावा, असेही त्यांनी सुचविले होते.

नियोजित जागेवर कोनशिला
स्मारकाच्या आराखड्याला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल, निधीदेखील उपलब्ध होईल. नियोजित जागेवर कोनशिला बसविली आहे.
-प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी

Web Title: Marathwada Liberation War memorial on paper itself; It has been a year, neither provision of money nor administrative approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.