मराठवाड्याचा आवाज हरवला; प्रसिद्ध विधीज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 06:17 PM2021-06-18T18:17:04+5:302021-06-18T18:21:17+5:30
अॅड देशमुख हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या गावचे. त्यांनी एल.एल.बी केल्यानंतर बॅरिस्टर गाडगीळ यांचे ज्युनियर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय आरंभिला.
औरंगाबाद : प्रसिद्ध विधीज्ञ प्रदीप गोविंदराव देशमुख (वय-६७,रा. सिडको एन-२) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष होते व त्या माध्यमातून त्यांनी मराठवाडा विकासाचे अनेक प्रश्न लावून धरले होते. स्वतंत्र मराठवाडा राज्य स्थापन झाले पाहिजे, या मागणीचा ते सतत पुनरुच्चार करीत असत. औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. समन्यायी पाणी वाटपासाठी आणि मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी अनेक सार्वजनिक हित याचिका यशस्वीपणे चालविल्या. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि विधी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
अॅड देशमुख हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या गावचे. त्यांनी एल.एल.बी केल्यानंतर बॅरिस्टर गाडगीळ यांचे ज्युनियर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय आरंभिला. बॅरिस्टर गाडगीळ लोकसभेचे सदस्य झाल्यानंतर देशमुखही दिल्लीला गेले. ते तेथेच नोकरीला लागले. औरंगाबाद येथील वकिल संघाचे एक प्रतिनिधी मंडळ औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून तत्कालीन पंतप्रधानांना निवेदन देण्यात करिता गेले होते. त्यावेळी देशमुख यांच्यामुळे बॅ. गाडगीळ यांनी त्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आज सकाळी मुकुंदवाडी समशानभूमीत दिवंगत प्रदीप देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या जनहित याचिका गाजल्या
प्रदीप देशमुख हे जनहित याचिका दाखल करणारे वकील म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध पावले होते. मराठवाड्याला हक्काचे गोदावरीचे पाणी मिळायला पाहिजे म्हणून बऱ्याच याचिका उच्च न्यायालयात केल्या होत्या. ते मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना करिता उच्च न्यायालयात एकटे लढले. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी राजीव गांधी मित्र मंडळाची स्थापना केली होती. पुढे त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला होता. एक चांगला वक्ता अशी त्यांची ख्याती होती.