मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय; ध्वजारोहणानंतर शिवसेनेने पुन्हा केले अभिवादन
By सुमेध उघडे | Published: September 17, 2022 01:39 PM2022-09-17T13:39:43+5:302022-09-17T13:40:31+5:30
Marathwada Muktisangram Din: दिल्लीची मर्जी राखण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यातून लवकर गेले
औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हैदराबाद येथे जाण्यासाठी वर्षानुवर्ष ठरलेली कार्यक्रमाची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलली. दिल्लीची मर्जी राखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे लागलीच तिकडे, त्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शिवसेनेकडून सकाळी ९ वाजता पुन्हा अभिवादन कार्यक्रम घेतला. (Marathwada Muktisangram Din )
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यान येथील शहीद स्तंभास सकाळी ७ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. दरवर्षी अभिवादनाचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता होतो, मात्र हैदराबाद येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमास जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ १५ मिनिटांत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला, अशी टीका शिवसेनेकडून होत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम झाला नाही. त्यांना महाराष्ट्र, मराठवाडयापेक्षा हैद्राबाद प्रिय आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. मुख्यमंत्री येथील कार्यक्रम करून हैदराबादला जाऊ शकले असते. मात्र, दिल्लीची मर्जी राखण्यासाठी कार्यक्रमाची वेळ बदलून ते हैदराबादकडे रवाना झाले, असेही दानवे म्हणाले.
हा मराठवाड्याचा अपमान
दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार होतो. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्राम कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यानी मराठवाड्यातील जनतेचा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे.