बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय स्पर्धेत मराठवाड्याच्या खेळाडूंचा डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:09 AM2019-02-13T01:09:56+5:302019-02-13T01:10:35+5:30
मराठवाडा ही प्रतिभावान क्रिकेटपटूंची खाण ठरत आहे. इकबाल सिद्दीकी, संजय बांगर, अंकित बावणे, विजय झोल, श्रीकांत मुंडे असे अनेक दर्जेदार क्रिकेटपटू मराठवाड्याने महाराष्ट्राला दिले. दिवसेंदिवस त्यात आणखी प्रतिभावान खेळाडूंची भर पडत आहे. त्यात विशेषत: बीडचा सचिन धस, सौरभ शिंदे आणि परभणीचा शिवराज शेळके या खेळाडूंनी तर अफलातून कामगिरी केली आहे. या त्रिकुटाने महाराष्ट्राला बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे.
जयंत कुलकर्णी।
औरंगाबाद : मराठवाडा ही प्रतिभावान क्रिकेटपटूंची खाण ठरत आहे. इकबाल सिद्दीकी, संजय बांगर, अंकित बावणे, विजय झोल, श्रीकांत मुंडे असे अनेक दर्जेदार क्रिकेटपटू मराठवाड्याने महाराष्ट्राला दिले. दिवसेंदिवस त्यात आणखी प्रतिभावान खेळाडूंची भर पडत आहे. त्यात विशेषत: बीडचा सचिन धस, सौरभ शिंदे आणि परभणीचा शिवराज शेळके या खेळाडूंनी तर अफलातून कामगिरी केली आहे. या त्रिकुटाने महाराष्ट्राला बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे.
या तीन खेळाडूंच्या बहुमूल्य योगदानामुळे महाराष्ट्राचा संघ तब्बल ९ वर्षांनंतर १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य मुंबई संघाला नमवतानाच चॅम्पियनचा बहुमान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे ९ वर्षांआधीदेखील महाराष्ट्राने मुंबईलाच धूळ चारून विजेतेपदाला गवसणी घातली होती. महत्त्वाचे म्हणजे या सामन्यातही उस्मानाबादच्या मोहसीन सय्यदने गोलंदाजीत ३८ धावांत ५ बळी आणि फलंदाजीत ५५ धावा करीत योगदान दिले होते, तर लातूरच्या विकास निरफळने ६0 व जालना येथील आशिष देशमुखने ४२ धावांचे योगदान दिले होते.
योगायोग म्हणजे दोन्ही वेळेस संघाचे व्यवस्थापकपद हे एमसीएचे १४ वर्षांखालील निवड समितीचे राजू काणे हेच होते. यावेळेसही महाराष्ट्राला १४ वर्षांखालील विजेतेपद पटकावून देण्यात बीडच्या सचिन धसने फलंदाजीत निर्णायक योगदान दिले, तसेच बीडचा सौरभ शिंदे व परभणीचा शिवराज शेळके यांनी अफलातून गोलंदाजी करताना महाराष्ट्राच्या यशात सिंहाचा वाटा उचलला.
मुंबईविरुद्धच्या लढतीत सौरभ शिंदेने पहिल्या डावात ३0 धावांत ६, तर दुसऱ्या डावात शिवराज शेळकेने ४२ धावांत ५ गडी बाद करताना आपला विशेष ठसा उमटवला. सौरभ शिंदेने बडोद्याचाही अर्धा संघ ३१ धावांत तंबूत पाठवला होता.
या तिघांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने मुंबईचा १४ धावांनी, बडोदा संघाचा एक डाव २४ धावांनी आणि गुजरातचा एक डाव आणि तब्बल १0५ धावांनी पराभव करण्यात यश मिळवले होते. सचिन धसने महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील संघांचेही प्रतिनिधित्व करताना ४४९ धावा केल्या. त्यात त्याने मुंबईविरुद्ध १0८ व मेघालयाविरुद्ध १५४ धावांची खेळी केली होती, तसेच गुजरातविरुद्ध ५५, सौराष्ट्रविरुद्ध ६0 व हरियाणाविरुद्ध ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचा रणजी संघाचा कर्णधार व शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित अंकित बावणे याच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्राने क्रिकेट इतिहासात २00७ मध्ये सर्वात प्रथम बीसीसीआयची १५ वर्षांखालील पॉली उम्रीगर चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. त्यावेळेसही वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अंतिम फेरीत मुंबईला नमवले होते.
त्याचप्रमाणे २0१४ मध्येदेखील महाराष्ट्राला रणजी ट्रॉफीत उपविजेतेपद पटकावून देण्यात मराठवाड्याच्या अंकित बावणे, विजय झोल आणि श्रीकांत मुंढे यांचे योगदानही निर्णायक ठरले होते. शमशुझमा काझी, राजवर्धन हंगरगेकर, मोहसीन सय्यद, रामेश्वर दौड, सत्यजित नाईक हेही बीसीसीआयच्या स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवत आहेत.
१२७ च्या सरासरीने काढल्या ५११ धावा
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाºया सचिन धसने तर महाराष्ट्राकडून अफलातून फलंदाजी करताना ५ डावांत तब्बल १२७ च्या सरासरीने व ७५.४८ च्या स्ट्राईकरेटने ५११ धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत पूर्ण पश्चिम विभागातून सर्वाधिक धावादेखील सचिन धस याच्याच नावावर आहेत. त्यापाठोपाठ सौराष्ट्रच्या अंश गोसावीने ९३.५0 च्या सरासरीने ५ डावांत ३७४ धावा केल्या आहेत.
आज झालेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेत सचिन धसने बलाढ्य मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ८४ व दुसºया डावात ५२ धावा केल्या, तसेच बडोदा संघाविरुद्ध २२८ धावांची मॅरेथॉन खेळी करताना गुजरातविरुद्ध १२७ धावांची शतकी खेळी केली. गोलंदाजीत बीडच्या सौरभ शिंदेने ७ डावांत १८ आणि शिवराज शेळकेने १२ गडी बाद करताना महाराष्ट्राच्या विजेतेपदात योगदान दिले.