'लोकमत' करणार मराठवाड्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 12:49 PM2022-02-25T12:49:23+5:302022-02-25T12:51:02+5:30

औरंगाबाद, नांदेड परिक्षेत्र, औरंगाबाद आयुक्तालयातून प्रत्येकी दहाजणांची होणार निवड

Marathwada police officers and employees will be honored by 'Lokmat' | 'लोकमत' करणार मराठवाड्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

'लोकमत' करणार मराठवाड्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

googlenewsNext

औरंगाबाद : विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना 'लोकमत'तर्फे दरवर्षी सन्मानित केले जाते. त्यामध्ये राजकीय, औद्योगिक, प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिकसह इतर क्षेत्रांसाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात येते. पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी अहाेरात्र काम करतात. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी 'लाेकमत सन्मान पुरस्कार' देऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

पोलीस विभागात काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबद्दल प्रोत्साहन मिळावे या हेतूने 'लोकमत'तर्फे हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. औरंगाबाद, नांदेड परिक्षेत्र आणि औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येकी १० अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस आयुक्त स्तरावर केली जाणार आहे. शिफारस केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार औरंगाबाद येथे लवकरच करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल.

या प्रकारांत देणार पुरस्कार
कर्तव्य बजावताना सर्वोच्च त्याग, न्यायालयीन उत्कृष्ट शिक्षा मिळवणे, उत्कृष्ट मुद्देमाल जप्ती (चोरी, दरोडा, फसवणूक, इत्यादी), कायदा व सुव्यवस्था प्रसंगांची उत्कृष्ट हाताळणी, वाहतूक व्यवस्थापन किंवा अपघात प्रतिबंधासाठी विशेष कार्य, मादक पदार्थविरोधी कारवाई, सायबर गुन्ह्यांची उकल, महिलांविरुद्ध गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास, बालकांविरुद्ध गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास, हरवलेल्या व्यक्तींचा शोध व बचाव, मुद्देमाल निर्गती, नावीन्यपूर्ण योजना ज्यांमुळे जनतेला उत्कृष्ट सेवा देता आली, इतर कोणतेही अत्युत्कृष्ट पोलीस कर्तव्य बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 'लोकमत'तर्फे निवड केली जाणार आहे. औरंगाबाद परिक्षेत्रासाठी sanmanaward2021@gmail.com या मेलवर पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वत:ची माहिती पाठवू शकतात. औरंगाबाद परिक्षेत्रासाठी जालन्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नेमली आहे. यात औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्यासह बीड व उस्मानाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदस्य आहेत.

Web Title: Marathwada police officers and employees will be honored by 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.