मराठवाड्यात तीन महिन्यांत ५१३ मि.मी.पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:08 AM2021-09-02T04:08:07+5:302021-09-02T04:08:07+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पावसाळ्यातील तीन महिन्यांत ५१३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ६७९ मि.मी. सरासरीच्या तुलनेत झालेले पर्जन्यमान ...
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पावसाळ्यातील तीन महिन्यांत ५१३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ६७९ मि.मी. सरासरीच्या तुलनेत झालेले पर्जन्यमान समाधानकारक असल्याचा दावा हवामान खात्याने केला. पावसाळ्याचा सप्टेंबर हा शेवटचा महिना असून १ सप्टेंबर रोजी विभागात ८.९ मि.मी. पाऊस झाला. यात औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात विभागात सुमारे १६६ मि.मी. पाऊस होण्याची गरज आहे. १ सप्टेंबर राेजी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ७१ मि.मी तर गोलेगांव मंडळात ११४ मि.मी. पाऊस बरसला. जालना जिल्ह्यातील भोकरदन ११२ मि.मी. सिपोरा मंडळात ७७ तर धावडा ६६, आन्वा १४१ आणि जाफ्राबाद मंडळात ८५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट अखेरीस पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर मोठ्या ११ प्रकल्पांपैकी जायकवाडी, माजलगाव आणि मांजरा प्रकल्पात कमी जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.
तीन महिन्यांत जिल्हानिहाय झालेला पाऊस असा
औरंगाबाद ४३१.२ मि.मी., जालना ४६१.३ मि.मी. बीड ३९४.१ मि.मी. लातूर ५२५ मि.मी. उस्मानाबाद ४१८.४ मि.मी. नांदेड ६४७ मि.मी. परभणी ५९२.३ मि.मी. हिंगोली ६४०.६ मि.मी. पाऊस यंदाच्या पावसाळ्यात नाेंदविला गेला आहे. गेल्यावर्षी आजवर ५६१.५ मि.मी पाऊस मराठवाड्यात झाला होता.
जायकवाडी ४३.३६ टक्क्यांवर, मानार, विष्णुपुरी तुडुंब
दोन दिवसांतील पावसामुळे जायकवाडी धरणात सुमारे अडीच ते तीन टक्क्यांनी जलसाठा वाढला आहे. धरणात सध्या ४३.३६ टक्के जलसाठा झाला आहे. नाशिककडून अद्याप पाण्याचा ओघ नसल्यामुळे जायकवाडी ५० टक्क्यांच्या आत आहे. निम्न दुधनामध्ये ९४, येलदरी ८७, सिध्देश्वर ९६, माजलगांव ५६, मांजरा २६, पैनगंगा ८२, मानार १०० टक्के भरले आहे. तर निम्न तेरणा प्रकल्पात ५७ टक्के, विष्णुपुरीत १०० टक्के, सिना कोळेगांवमध्ये ८ टक्के, शहागड बंधारा ३५ तर खडका बंधाऱ्यात ९९ टक्के जलसाठा सध्या आहे.